Talathi suspended : पातूर तालुक्यातील सुकळी व विवरा परिसरात माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. मात्र, या परिसरात नुकसानच झाले नसल्याची माहिती तलाठी याेगेश्वरी चव्हाण यांनी दिली हाेती. त्यामुळे, आपत्तीच्या काळात शासनाची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवत ग्राम महसूल अधिकारी याेगेश्वरी चव्हाण यांना बाळापूरचे उपविभागीय अधिकारी निखील खेमनर यांनी २६ सप्टेंबर रोजी निलंबित केले.दरम्यान, आठवडाभरात तलाठी निलंबनाची दुसरी कारवाई झाल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

माेठ्या प्रमाणात नुकसान हाेवूनही नुकसानच नसल्याचा दिला हाेता अहवाल : आठवड्याभरात दुसरी कारवाई
राहुल सोनोने
दिग्रस (बु.) : पातूर तालुक्यातील सुकळी व विवरा परिसरात माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. मात्र, या परिसरात नुकसानच झाले नसल्याची माहिती तलाठी याेगेश्वरी चव्हाण यांनी दिली हाेती. त्यामुळे, आपत्तीच्या काळात शासनाची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवत ग्राम महसूल अधिकारी याेगेश्वरी चव्हाण यांना बाळापूरचे उपविभागीय अधिकारी निखील खेमनर यांनी २६ सप्टेंबर रोजी निलंबित केले.दरम्यान, आठवडाभरात तलाठी निलंबनाची दुसरी कारवाई झाल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
२७ मे २०२५ रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. याबाबत पंचनामे करून तातडीने अहवाल सादर करण्याचे तहसीलदारांचे आदेश असतानाही तलाठी चव्हाण यांनी पिकांचे नुकसान नसल्याची माहिती तहसीलच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर दिली. यामुळे शेतकऱ्यांनी थेट खासदार व आमदारांकडे तक्रार केली. त्यांच्या पत्रावरून तहसीलदारांनी मंडळ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणीचे आदेश दिले. पाहणीत भुईमूग, तीळ आणि कांदा या पिकांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तलाठी यांनी प्रत्यक्ष पाहणी न करता शासनाची दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाले. तहसीलदारांच्या अहवालावरून उपविभागीय अधिकाऱ्यांनी २६ सप्टेंबर रोजी निलंबनाचे आदेश काढले.
शेतकऱ्यांकडून गंभीर आरोप
तलाठी यांनी शेतकऱ्यांकडून कोऱ्या रजिस्टरवर स्वाक्षऱ्या घेण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी नकार दिल्यावर तलाठी रागावल्या व चान्नी पोलिसांना बोलावून खोटे आरोप करत पंचनामे करण्यास नकार दिला. परिणामी मंडळ अधिकारी व कृषी सहाय्यक यांचे अहवाल निर्णायक ठरले.
आठवडाभरात दुसरे निलंबन
पातूर तालुक्यातील उमरा परिसरात सर्वेक्षणात गडबड केल्याप्रकरणी १७ सप्टेंबर रोजी एका तलाठ्याला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर २६ सप्टेंबर रोजी तलाठी चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. आठवडाभरात महसूल विभागातील हे दुसरे निलंबन ठरले असून त्यामुळे विभागात खळबळ उडाली आहे.

