Mahabreaking

[breaking_news]

Harichaitanya Maharaj:‘ज्याला राम कळाला तो भाग्यशाली’ – ह.भ.प. हरिचैतन्य महाराज यांचे निरूपण

Harichaitanya Maharaj: “श्रीराम प्रभू वनवासाला निघाले तेव्हा त्यांनी मार्गात अनेकांची भेट घेतली. शरभंग ऋषी व शबरी यांच्या भक्तीमागील समर्पण समजून घेतल्याशिवाय राम कळत नाही. ज्याला राम कळाला तोच खऱ्या अर्थाने भाग्यशाली,” असे प्रतिपादन ह.भ.प. श्री हरिचैतन्य महाराज यांनी केले.

Harichaitanya Maharaj

अशोक इंगळे

साखरखेर्डा : “श्रीराम प्रभू वनवासाला निघाले तेव्हा त्यांनी मार्गात अनेकांची भेट घेतली. शरभंग ऋषी व शबरी यांच्या भक्तीमागील समर्पण समजून घेतल्याशिवाय राम कळत नाही. ज्याला राम कळाला तोच खऱ्या अर्थाने भाग्यशाली,” असे प्रतिपादन ह.भ.प. श्री हरिचैतन्य महाराज यांनी केले.

अधिक मासानिमित्त श्री पलसिद्ध महास्वामी मठात आयोजित कीर्तन सोहळ्यात ते निरूपण करत होते. यावेळी त्यांनी रामायणातील प्रसंग स्पष्ट करताना सांगितले की, श्रीराम प्रभूंनी लक्ष्मण व सीतामाईंना सांगितले की, “तुम्ही रामासोबत राहूनही राम समजून घेतला नाही, मात्र शरभंग व शबरी यांनी अनेक वर्षे एकाच ठिकाणी भक्तिभावाने प्रतीक्षा केली, त्यामुळे त्यांना राम कळाला.”

कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवसाचे प्रायोजक माजी सरपंच पूनम पाटील व महेंद्र पाटील यांनी सपत्नीक महाराजांचे पूजन करून सत्कार केला. यावेळी विचारपीठावर मठाधिपती सिद्धलिंग शिवाचार्य महाराज, सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज, शिवशंकर शिवाचार्य महाराज, काशीनाथ शिवाचार्य महाराज, शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्यासह अनेक सद्गुरू उपस्थित होते.

कीर्तन सेवेदरम्यान हरिचैतन्य महाराज म्हणाले की, “भगवान शंकर भोळे आहेत. जो भक्त मनोभावे आराधना करतो, त्याच्यावर ते प्रसन्न होतात.” यावेळी त्यांनी एका लाकूडतोड्याची कथा सांगत समाधान, सद्भावना आणि सकारात्मक विचार यांचे महत्त्व पटवून दिले. दुसऱ्याच्या वाईटाची इच्छा केल्यास त्याचे दुष्परिणाम स्वतःलाच भोगावे लागतात, असे सांगत त्यांनी समाजकार्य करताना दुसऱ्यांच्या कार्यात अडथळे आणू नयेत, असा संदेश दिला.

“ईश्वर प्रत्येकाला देतो; मात्र मागणी करताना स्वतःसह दुसऱ्यांचेही कल्याण व्हावे, ही भावना ठेवली पाहिजे. संतांच्या कार्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहा. नकारात्मक विचार माणसाला अधोगतीकडे घेऊन जातात,” असेही त्यांनी सांगितले.

श्री पलसिद्ध महास्वामी यांच्या कार्याचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, “साखरखेर्डा नगरीत श्री पलसिद्ध महास्वामींचे वास्तव्य लाभल्याने या गावाचा आध्यात्मिक उद्धार झाला. मठाच्या उभारणीचे विविध टप्पे शेकडो वर्षांपूर्वी पूर्ण झाले असून सद्गुरू शिवाचार्यरत्न सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या कार्यकाळात तिसऱ्या टप्प्याचे काम झाले. नम्र व सहनशील गुरु लाभणे हे भाग्य असून त्यांचा गुरुप्रसाद म्हणजे साक्षात श्री पलसिद्ध महास्वामींचा प्रसाद आहे.”

यावेळी संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या अभंगांवर निरूपण करत त्यांनी श्रद्धा, अध्यात्म आणि सामाजिक जागृती याविषयी मार्गदर्शन केले. “माझा चमत्कारांवर विश्वास नाही, श्रद्धेवर आहे. जगात कोणीही चमत्कार करू शकत नाही. चमत्काराच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या ढोंगी बाबांपासून सावध राहिले पाहिजे,” असे प्रबोधनही त्यांनी उपस्थितांना केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top