MLA Manoj Kayandes: बुलढाणा जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी चिखली तालुक्यातील हातणी-वळती येथे प्रस्तावित माईस (Meetings, Incentives, Conferences and Exhibitions) प्रकल्प, सिंदखेड राजा येथील मातृतीर्थ ‘जिजाऊ सृष्टी’ तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) पर्यटन रिसॉर्ट उभारणीच्या प्रस्तावांना गती देण्याबाबत राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. या संदर्भात पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

सिंदखेड राजाला पर्यटनाचे नवे केंद्र बनविण्याची तयारी; मंत्री शंभूराज देसाईंची ग्वाही
गजानन तिडके
देऊळगाव राजा : बुलढाणा जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी चिखली तालुक्यातील हातणी-वळती येथे प्रस्तावित माईस (Meetings, Incentives, Conferences and Exhibitions) प्रकल्प, सिंदखेड राजा येथील मातृतीर्थ ‘जिजाऊ सृष्टी’ तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) पर्यटन रिसॉर्ट उभारणीच्या प्रस्तावांना गती देण्याबाबत राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. या संदर्भात पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

सिंदखेड राजा मतदार संघातील विकासकामांसाठी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीनंतर या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.
बैठकीला मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील, आमदार श्वेता महाले, आमदार मनोज कायंदे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे, पर्यटन विभागाचे उपसचिव विजय पोवार, सहाय्यक संचालक रवींद्र पवार तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, उपवनसंरक्षक, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत हातणी व वळती येथील प्रस्तावित माईस प्रकल्पासाठी आवश्यक जमीन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच प्रकल्पाचा मास्टर प्लॅन, वास्तुरचना, सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) आणि खर्चाचा अंदाज तातडीने तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रकल्पासाठी आवश्यक निधी, आर्थिक नियोजन आणि टप्प्याटप्प्याने अंमलबजावणीच्या आराखड्यावरही सविस्तर चर्चा झाली.
याशिवाय, राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाला साजेशी ‘जिजाऊ सृष्टी’ उभारण्याबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. सिंदखेड राजा येथे यापूर्वी करण्यात आलेल्या संवर्धन व जतनाच्या कामांनंतर आता या परिसराला आधुनिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी जिजाऊ सृष्टी उभारण्याचा प्रस्ताव पुढे नेण्यात येणार आहे.
या प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अंतिम मान्यता मिळविण्यासाठी पर्यटन विभागाकडून पाठपुरावा करण्यात येणार असून, त्यानंतर पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्या समन्वयाने निधी, आराखडा आणि अंमलबजावणीची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
बैठकीतील आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत पर्यटकांसाठी आधुनिक पर्यटन रिसॉर्ट उभारण्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे राज्यभरातून तसेच देशभरातून येणाऱ्या पर्यटकांना दर्जेदार निवास व पर्यटन सुविधा उपलब्ध होणार असून सिंदखेड राजा हे ऐतिहासिक पर्यटन केंद्र म्हणून अधिक सक्षमपणे विकसित होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी बुलढाणा जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी लवकरच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. जिल्ह्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या बैठकीनंतर आमदार मनोज कायंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, पालकमंत्री मकरंद आबा पाटील तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आभार मानले. जिजाऊंच्या जन्मभूमीचा जागतिक स्तरावर गौरव वाढविण्यासह बुलढाणा जिल्ह्याच्या पर्यटन आणि आर्थिक विकासासाठी हे प्रकल्प मैलाचा दगड ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

