Bailiff from Mehkar: मालमत्ता जप्तीचे न्यायालयीन वॉरंट बजावू नये यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना दिवाणी न्यायालय, मेहकर येथील बेलीफ जगदीश सुखदेव राऊत (वय ३१) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) बुलढाणा पथकाने गुरुवारी रंगेहात पकडले. या कारवाईमुळे न्यायालयीन वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मालमत्ता जप्तीचे वॉरंट न बजावण्यासाठी १५ हजारांची मागणी; तडजोडीनंतर १० हजार स्वीकारताना रंगेहात पकडले
मेहकर : मालमत्ता जप्तीचे न्यायालयीन वॉरंट बजावू नये यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना दिवाणी न्यायालय, मेहकर येथील बेलीफ जगदीश सुखदेव राऊत (वय ३१) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) बुलढाणा पथकाने गुरुवारी रंगेहात पकडले. या कारवाईमुळे न्यायालयीन वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार (वय ५३, व्यवसाय – शेती) यांच्या विरोधात दिवाणी न्यायालय, मेहकर येथे दिवाणी दावा प्रलंबित आहे. या प्रकरणात न्यायालयाने जंगम मालमत्ता जप्तीचे वॉरंट काढले होते. हे वॉरंट बजावू नये आणि ते न बजावताच परत करण्यासाठी बेलीफ जगदीश राऊत यांनी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदाराने एसीबीकडे केली होती.
तक्रारीची पडताळणी ६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते १.०९ या वेळेत मेहकर न्यायालयाच्या आवाराबाहेर करण्यात आली. पडताळणीदरम्यान आरोपीने जंगम मालमत्ता जप्तीचे वॉरंट न बजावण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर झालेल्या तडजोडीत आरोपीने १० हजार रुपये स्वीकारण्यास संमती दिली.
यानंतर एसीबीच्या पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला. गुरुवारी दुपारी २.०७ ते २.१२ या वेळेत मेहकर बसस्थानक परिसरात तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताच बेलीफ जगदीश राऊत याला रंगेहात ताब्यात घेण्यात आले.
आरोपी जगदीश सुखदेव राऊत हा दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर), मेहकर येथे बेलीफ म्हणून कार्यरत असून त्याचे मूळ वास्तव्य माळीपुरा, वार्ड क्रमांक ३, साखरखेर्डा (ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) येथे आहे.
या प्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, गुन्हा नोंद होताच आरोपीला अटक करण्यात येणार असल्याची माहिती एसीबीने दिली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा येथील पोलीस निरीक्षक रमेश पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईवर पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांनी पर्यवेक्षण केले. पथकात पोलीस कॉन्स्टेबल शैलेश सोनवणे, पंढरी शेळके आणि नितीन शेटे यांचा सहभाग होता. या कारवाईस अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर यांचे मार्गदर्शन लाभले.
नागरिकांना एसीबीचे आवाहन
कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडून लाचेची मागणी होत असल्यास अथवा भ्रष्टाचाराबाबत माहिती असल्यास नागरिकांनी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांनी केले आहे.

