Mahabreaking

[breaking_news]

  Demolish: शतकभर जुनी पोलिस वसाहत पाडून नवे निवासस्थान उभारा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदन

Demolish: साखरखेर्डा आणि आंढेरा येथील पोलिस कर्मचाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, दोन्ही ठिकाणी आधुनिक व सर्व सुविधांनी युक्त पोलिस वसाहती उभारण्यासाठी शासनाने तातडीने निधी मंजूर करावा, अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुर देशपांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Demolish

   पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न ऐरणीवर; साखरखेर्डा व आंढेरा वसाहतींसाठी निधीची मागणी

साखरखेर्डा: साखरखेर्डा आणि आंढेरा येथील पोलिस कर्मचाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, दोन्ही ठिकाणी आधुनिक व सर्व सुविधांनी युक्त पोलिस वसाहती उभारण्यासाठी शासनाने तातडीने निधी मंजूर करावा, अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुर देशपांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मुंबई येथे ४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन देशपांडे यांनी साखरखेर्डा पोलिस ठाण्यात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न मांडला. सध्या अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थाने उपलब्ध नसल्यामुळे त्यांना गावात भाड्याने खोल्या घेऊन राहावे लागत असल्याचे त्यांनी मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, साखरखेर्डा पोलिस ठाण्यालगत सुमारे तीन एकर जागा इंग्रजांच्या काळापासून पोलिस निवासस्थानासाठी राखीव आहे. त्याच ठिकाणी ब्रिटिश काळात बांधण्यात आलेली निवासस्थाने आज सुमारे शंभर वर्षे जुनी झाली असून ती पूर्णपणे मोडकळीस आली आहेत. अनेक इमारतींची छते कोसळली असून ती वापरण्यायोग्य राहिलेली नाहीत.

देशपांडे यांनी या मोडकळीस आलेल्या इमारती पाडून त्याच जागेवर आधुनिक, बहुमजली व सर्व सुविधांनी सुसज्ज पोलिस निवासस्थान उभारण्याची मागणी केली आहे. सर्व कर्मचारी एकाच ठिकाणी वास्तव्यास असल्यास कायदा व सुव्यवस्थेच्या आपत्कालीन परिस्थितीत त्यांची तातडीने उपलब्धता राहील, असा मुद्दाही त्यांनी मांडला.

सध्या अनेक पोलीस कर्मचारी चिखली, बुलढाणा आणि मेहकर येथून दररोज ये-जा करीत असल्याने त्यांचा वेळ आणि आर्थिक खर्च वाढत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच पोलिस ठाण्यासमोरील परिसरात मोडकळीस आलेली शासकीय वाहने आणि भंगार साहित्य पडून असल्याने परिसराचे विद्रूपीकरण होत आहे. हे भंगार हटवून त्या जागेचा नियोजनबद्ध वापर करून नवीन निवासस्थान उभारण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, आंढेरा येथील पोलिस वसाहतीचा प्रश्नही अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तेथे निवासस्थान उभारण्यासाठी पुरेशी शासकीय जागा उपलब्ध असूनही अद्याप बांधकामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे आंढेरा येथेही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज शासकीय निवासस्थाने उभारण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी देशपांडे यांनी केली आहे.

राज्यातील पोलीस दल चोवीस तास नागरिकांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असते. त्यामुळे त्यांच्या मूलभूत गरजांचा विचार करून साखरखेर्डा आणि आंढेरा येथील पोलिस वसाहतींचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा, अशी अपेक्षा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top