Mahabreaking

[breaking_news]

Stop Diarrhea campaign launched :स्टॉप डायरिया अभियानाचा शुभारंभ;  १.८४ लाख बालकांना ओआरएस व झिंक गोळ्यांचे वितरण

Stop Diarrhea campaign launched : पाच वर्षांखालील बालकांमध्ये अतिसार (डायरिया) या आजारामुळे होणारे मृत्यू आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘स्टॉप डायरिया अभियान’ राबविण्यात येत आहे. १६ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या अभियानांतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील १ लाख ८४ हजार ६३३ बालकांना झिंक गोळ्या आणि ओआरएस (ओरल रिहायड्रेशन सोल्युशन) द्रावणाचे वितरण करण्यात येणार आहे.

Stop Diarrhea

 अतिसारमुक्त बालपणासाठी आरोग्य विभाग सज्ज; ३१ जुलैपर्यंत विशेष जनजागृती मोहीम

बुलढाणा : पाच वर्षांखालील बालकांमध्ये अतिसार (डायरिया) या आजारामुळे होणारे मृत्यू आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘स्टॉप डायरिया अभियान’ राबविण्यात येत आहे. १६ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या अभियानांतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील १ लाख ८४ हजार ६३३ बालकांना झिंक गोळ्या आणि ओआरएस (ओरल रिहायड्रेशन सोल्युशन) द्रावणाचे वितरण करण्यात येणार आहे.

अभियानाचे जिल्हास्तरीय उद्घाटन आयुष्यमान आरोग्य मंदिर, पाडळी येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव तथा जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र पाडळीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल जवरे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमात आरोग्य सेविकांनी ओआरएस द्रावण तयार करण्याचे प्रात्यक्षिक सादर करून अतिसार झालेल्या बालकांच्या उपचारामध्ये त्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच आशा स्वयंसेविकांनी योग्य हात धुण्याच्या पद्धतीचे प्रात्यक्षिक सादर करत स्वच्छता आणि रोगप्रतिबंधक उपाययोजनांबाबत जनजागृती केली.

अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील २ हजार ८३ आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी आणि विविध स्तरांवरील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आशा स्वयंसेविकांमार्फत प्रत्येक पात्र बालकाच्या घरी भेट देऊन ओआरएस व झिंक गोळ्यांचे वितरण करण्यात येणार असून अतिसार प्रतिबंधाबाबत मार्गदर्शनही केले जाणार आहे.

जिल्ह्यातील सर्व उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, शासकीय आरोग्य संस्था तसेच अंगणवाडी केंद्रांचा या अभियानात सक्रिय सहभाग राहणार आहे. पालकांना अतिसार झालेल्या बालकांना तात्काळ ओआरएस द्रावण देणे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार झिंक गोळ्यांचा वापर करणे, सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा वापर करणे आणि स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणे याबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी अतिसार हा बालमृत्यूचे एक प्रमुख कारण असल्याचे सांगून योग्य वेळी उपचार, ओआरएसचा वापर आणि स्वच्छतेच्या सवयी यांमुळे या आजारावर प्रभावी नियंत्रण मिळविता येते, असे नमूद केले. नागरिकांनी स्वच्छता राखून सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा वापर करावा तसेच अतिसाराची लक्षणे दिसताच तातडीने जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमास जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी राजेश धुताडमल, डॉ. शैलेश खंडारे, डॉ. शिवानंद शिंगाडे, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य विभागाने हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top