Speeding Eeco Car Crashes : राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनर ट्रकला प्रवासी इको कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दोन जण ठार तर सहा प्रवाशी गंभीर जखमी झाले. ही घटना बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवीन बायपासजवळ गुरुवारी रात्री घडली. अब्दुल कुदूस शेख बिरान (वय ७०) आणि मोहम्मद अरशान मोहम्मद इरशाद (वय ७) दोघेही रा.वाडेगाव, ता. बाळापूर अशी मृतकांची नावे आहेत.

बोरगाव मंजू बायपासजवळ भीषण अपघात; सात वर्षीय बालकाचा मृतकांचा समावेश
बोरगाव मंजू : राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनर ट्रकला प्रवासी इको कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दोन जण ठार तर सहा प्रवाशी गंभीर जखमी झाले. ही घटना बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवीन बायपासजवळ गुरुवारी रात्री घडली. अब्दुल कुदूस शेख बिरान (वय ७०) आणि मोहम्मद अरशान मोहम्मद इरशाद (वय ७) दोघेही रा.वाडेगाव, ता. बाळापूर अशी मृतकांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, इको कार क्रमांक एमएच ३० पी ३७०१ ही मुर्तीजापूरहून अकोल्यामार्गे वाडेगावकडे जात होती. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील नवीन बायपासजवळ कंटेनर ट्रक क्रमांक आरजे ३० जीबी १००१ हा रस्त्यावर उभा होता. रात्रीच्या अंधारात ट्रक चालकाने वाहनाच्या मागे कोणतेही दिशादर्शक चिन्ह अथवा इशारा दिवे न लावल्याने पाठीमागून येणाऱ्या कार चालकाला ट्रक उभा असल्याचा अंदाज आला नाही. परिणामी इको कार थेट कंटेनरवर आदळली.
या भीषण अपघातात कारमधील अब्दुल कुदूस शेख बिरान आणि सात वर्षीय मोहम्मद अरशान यांचा जागीच मृत्यू झाला. तर बिस्मिल्ला बी अब्दुल कुदूस (वय ६०), गुलनाज परवीन शेख महेबूब (वय ४५), मिनाज परवीन मोहम्मद शकील (वय ४०), मुमताज परवीन शेख सलाम (वय ४२), चालक मोहम्मद मुसिब गुलाम खाजा (वय ३७) आणि शेख इरफान अब्दुल कुदूस (वय ३२) हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस उपनिरीक्षक मनोज उघडे, हेडकॉन्स्टेबल संजय भारसाकळे, अमोल मोरे आदींनी मदतकार्य राबवत जखमींना उपचारासाठी रवाना केले. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव मंजू पोलीस करीत आहेत.

