Khamgaon Shaken! : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यावर लोखंडी सब्बलने वार करून हत्या केल्याची घटना गुरूवारी मध्यरात्री खामगाव शहरात घडली. विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपी पतीने खामगाव शहर पोलीस स्टेशन गाठत आपण पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. सविता प्रकाश सोळंके ( २२) असे मृतक महिलेचे नाव आहे. तसेच प्रकाश रुपलाल सोळंके असे आरोपी पतीचे नाव आहे.

लोखंडी सब्बलने डोक्यावर वार; पोलीस स्टेशनला स्वत:च हजर होवून दिली कबुली
खामगाव: कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यावर लोखंडी सब्बलने वार करून हत्या केल्याची घटना गुरूवारी मध्यरात्री खामगाव शहरात घडली. विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपी पतीने खामगाव शहर पोलीस स्टेशन गाठत आपण पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. सविता प्रकाश सोळंके ( २२) असे मृतक महिलेचे नाव आहे. तसेच प्रकाश रुपलाल सोळंके असे आरोपी पतीचे नाव आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रेल्वेगेट परिसरातील झोपडपट्टी परिसरात सविता प्रकाश सोळंके व प्रकाश रुपलाल सोळंके हे राहतात. त्यांच्यात गत काही दिवसांपासून कौटुंबिक वाद होत होता. गुरुवारी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा जोरदार भांडण झाले. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी प्रकाश सोळंके याने लोखंडी सब्बलने पत्नीच्या डोक्यावर जबर मारहाण केल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती पूजा रमेश सोळंके हिने फिर्यादी संजय शेनाजी मेढे ( ४३) यांना दिली. त्यानंतर फिर्यादी आरोपीच्या घरी पोहोचले असता सविता सोळंके ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. यावेळी आरोपी प्रकाश हा हातात लोखंडी सब्बल घेऊन घटनास्थळी उभा होता. आपण सविताला मारले असून आता पोलीस स्टेशनला जात आहे,असे सांगून आरोपी तेथून निघून गेल्याचे फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि विकास पाटील करीत आहेत.

