Farmers Outrage in Murtizapur : तालुक्यातील आठही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी होऊनही फक्त दोन मंडळांनाच तोकडा पीकविमा मंजूर करण्यात आल्याच्या निषेधार्थ १५ मे रोजी शेतकऱ्यांनी भव्य ट्रॅक्टर महामोर्चा काढत शासन आणि विमा कंपनीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

आठही महसूल मंडळांना न्याय द्या; ट्रॅक्टर महामोर्चातून शासनाला इशारा
संजय उमक
मूर्तिजापूर : तालुक्यातील आठही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी होऊनही फक्त दोन मंडळांनाच तोकडा पीकविमा मंजूर करण्यात आल्याच्या निषेधार्थ १५ मे रोजी शेतकऱ्यांनी भव्य ट्रॅक्टर महामोर्चा काढत शासन आणि विमा कंपनीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

शेकडो ट्रॅक्टर आणि हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत निघालेल्या या महामोर्चाने शहरातून मार्गक्रमण करत एसडीओ कार्यालय गाठले. आंदोलनकर्त्यांनी यावेळी शासनाच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अतिवृष्टीमुळे सर्वच महसूल मंडळांतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना विमा वितरणात अन्याय करण्यात आला. काही शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ काहीशे रुपये जमा झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला. शेतकऱ्यांकडून विमा प्रीमियमच्या नावाखाली मोठी रक्कम घेतली जाते; मात्र भरपाई देताना अन्याय केला जातो. ही थेट फसवणूक आहे,” असा आरोप आंदोलकांनी केला. विमा कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
राहूल राठी व राजू वानखडे यांनी “फक्त आश्वासने नकोत, प्रत्यक्ष खात्यात रास्त विमा जमा झाला पाहिजे. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल,” असा इशारा दिला. पीकविम्यासोबतच कर्जमाफी, प्रोत्साहन निधी, अतिवृष्टी मदत, वीजबिल माफी अशा विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. आंदोलनादरम्यान काही काळ वातावरण चांगलेच तापले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा बंदोबस्त ठेवला होता. संध्याकाळ पर्यंत आंदोलन सुरुच असल्याने आता प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेते याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

