Speeding car : देऊळगाव राजा–चिखली मार्गावरील दगडवाडी शिवारात भरधाव व निष्काळजीपणे चालविलेल्या कारने दुचाकीला धडक दिल्याने तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना १० जुलै रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी कारचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम २८१, १२५(अ) व १२५(ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

अचानक ब्रेक आणि डावीकडे वळल्याने अपघात; देऊळगाव राजा–चिखली मार्गावर तिघे जखमी
गजानन तिडके
देऊळगाव राजा : देऊळगाव राजा–चिखली मार्गावरील दगडवाडी शिवारात भरधाव व निष्काळजीपणे चालविलेल्या कारने दुचाकीला धडक दिल्याने तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना १० जुलै रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी कारचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम २८१, १२५(अ) व १२५(ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंढेरा येथील सौ. अक्षदा भगवान पवार (वय ६०) यांनी जालना येथील कलावती हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून गुन्हा नोंदविण्यात आला. फिर्यादी या त्यांचा पुतण्या रवि रविलाल पवार आणि विठ्ठल पवार यांच्यासोबत दुचाकीने देऊळगाव राजावरून अंढेरा गावाकडे जात होते.
दरम्यान, देऊळगाव राजा–चिखली रस्त्यावरील दगडवाडी शिवारात पंढरीनाथ नारायण जायभाये यांच्या शेताजवळ समोरून येणाऱ्या एमएच-२८-बीक्यू-९८४१ क्रमांकाच्या होंडा व्हेन्यू कारच्या चालकाने भरधाव वेगात वाहन चालवत अचानक ब्रेक मारून डावीकडे वळण घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळे संबंधित कारने एमएच-२८-बीएक्स-६४०८ क्रमांकाच्या बजाज पल्सर दुचाकीच्या डाव्या बाजूस जोरदार धडक दिली.
या अपघातात दुचाकीवरील रवि पवार, सौ. अक्षदा पवार आणि विठ्ठल पवार हे तिघेही गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सौ. अक्षदा पवार यांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायम अप क्रमांक ३१६/२०२६ नोंदविण्यात आला असून, पोलीस हेडकॉन्स्टेबल विश्वनाथ काकड यांनी फिर्याद नोंदवून सादर केली. गुन्ह्याची नोंद पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद गवई यांनी केली असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विश्वनाथ काकड करीत आहेत. आरोपी कारचालकाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

