Snakebite while cleaning :तालुक्यातील आळंद फाटा येथील गणपती मंदिर परिसरात साफसफाईचे काम करत असताना साप चावल्याने मेहुनाराजा येथील एका वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (२४ मे) सकाळी घडली. ज्ञानदेव मुक्ताराम जाधव (वय ६५) असे मृतक वृद्धाचे नाव आहे.

देऊळगाव राजा : तालुक्यातील आळंद फाटा येथील गणपती मंदिर परिसरात साफसफाईचे काम करत असताना साप चावल्याने मेहुनाराजा येथील एका वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (२४ मे) सकाळी घडली. ज्ञानदेव मुक्ताराम जाधव (वय ६५) असे मृतक वृद्धाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेहुनाराजा येथील रहिवासी ज्ञानदेव मुक्ताराम जाधव (वय ६५) हे रविवारी सकाळी सुमारे ८.३० वाजताच्या सुमारास आळंद फाटा येथील गणपती मंदिर परिसरात साफसफाईचे काम करीत होते. यावेळी अचानक त्यांच्या हाताला साप चावल्याची घटना घडली. सर्पदंश झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, देऊळगाव राजा येथे दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
या प्रकरणी मृतकांच्या नातेवाईक तथा फिर्यादी इंदु उद्धव जाधव यांनी दिलेल्या माहितीवरून देऊळगाव राजा पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद (मर्ग क्र. २२/२०२६) करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद साळवे करीत आहेत.

