Small family, happy family: जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांविषयी जनजागृती करण्यासाठी आणि ‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे शनिवारी जनजागृती रॅली व मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत आरोग्यदायी समाज घडविण्याचा सामूहिक संकल्प करण्यात आला.

लोकसंख्या स्थिरीकरणासाठी बुलढाण्यात जनजागृती; कुटुंब नियोजनाबाबत नागरिकांना मार्गदर्शन
बुलढाणा : जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांविषयी जनजागृती करण्यासाठी आणि ‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे शनिवारी जनजागृती रॅली व मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत आरोग्यदायी समाज घडविण्याचा सामूहिक संकल्प करण्यात आला.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकसंख्या स्थिरीकरण, कुटुंब कल्याण, माता-बाल आरोग्य आणि आरोग्यदायी समाजनिर्मिती या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयातून शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. घोषणाबाजी आणि माहितीपर फलकांच्या माध्यमातून नागरिकांना लहान कुटुंबाचे महत्त्व, सुजाण पालकत्व, मातृ व बाल आरोग्य संवर्धन तसेच लोकसंख्या नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती देण्यात आली.
यावेळी जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव यांनी वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक व आरोग्यविषयक आव्हानांवर प्रकाश टाकला. प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या तात्पुरत्या व कायमस्वरूपी कुटुंब नियोजन साधनांची माहिती देत नागरिकांनी या विनामूल्य शासकीय सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत आरोग्यदायी, सशक्त आणि प्रगत गाव उभारण्याचा सामूहिक संकल्प करण्यात आला. निरोगी नागरिक हेच गावाच्या आणि देशाच्या विकासाचे आधार असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
समारोपप्रसंगी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण घोंगटे यांनी नागरिकांनी शासकीय आरोग्य योजनांचा लाभ घेऊन कुटुंबाचे आरोग्य जपावे आणि लोकसंख्या स्थिरीकरणासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण घोंगटे, सार्वजनिक आरोग्य परिचारिका श्रीमती शितल साखळीकर, विस्तार अधिकारी शालिक गवई, जिल्हा रुग्णालयाच्या प्राचार्या श्रीमती मिना शेळके, वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, परिचारिका प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी तसेच आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

