election process : विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी आणि शासनव्यवस्थेची प्रत्यक्ष ओळख व्हावी या उद्देशाने पातूर येथील सावित्रीबाई फुले प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक लोकशाही पद्धतीने उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

विद्यार्थ्यांनी निवडले आपले मंत्री; सावित्रीबाई फुले विद्यालयात लोकशाही पद्धतीने निवडणूक
पातूर : विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी आणि शासनव्यवस्थेची प्रत्यक्ष ओळख व्हावी या उद्देशाने पातूर येथील सावित्रीबाई फुले प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक लोकशाही पद्धतीने उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
या निवडणुकीत सार्वत्रिक निवडणुकीच्या धर्तीवर संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात आली. निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणे, उमेदवारी अर्ज स्वीकारणे, अर्जांची छाननी, माघार घेण्याची संधी, प्रचारासाठी स्वतंत्र कालावधी आणि मतदान अशा सर्व टप्प्यांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली.
शाळेच्या प्रशासनात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढावा या उद्देशाने शिक्षण, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक तसेच महिला व बालकल्याण अशा विविध खात्यांची स्थापना करण्यात आली आहे. निवडून आलेले विद्यार्थी संबंधित खात्यांचे मंत्री म्हणून वर्षभर काम करणार असून विद्यार्थ्यांच्या समस्या, सूचना आणि गरजा शाळा व्यवस्थापनापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पार पाडणार आहेत.
यंदा प्रथमच महिला व बालकल्याण खाते सुरू करण्यात आले असून त्यासाठी स्वतंत्र मंत्रिपदाची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रश्न, अडचणी आणि आवश्यक बाबींकडे अधिक प्रभावीपणे लक्ष दिले जाणार आहे.
निवडून आलेल्या मंत्र्यांमधून पुढे लोकशाही पद्धतीने शालेय मुख्यमंत्री निवडला जाणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शाळा व्यवस्थापन समितीच्या सूचनेनुसार प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सचिन ढोणे आणि माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक जे. डी. कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना लोकशाहीची तत्त्वे, मतदानाचे महत्त्व, जबाबदारीची जाणीव आणि नेतृत्वगुण विकसित करण्याची संधी मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

