Rural Livestock Population : चाराटंचाई आणि वाढत्या खर्चामुळे पशुधन बाळगणे शेतकऱ्यांसाठी जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पशुधनाची संख्या घसरल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. शेतीपूरक व्यवसाय राबविण्यासाठी पशुधन हा उत्तम पर्याय मानला जातो. मात्र, शेती मशागतीसाठी आता ट्रॅक्टरचा वापर वाढल्याने बैलजोडी व इतर गुरांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.

शेतीपूरक व्यवसायासाठी पशुधन उत्तम पर्याय; मशागतीसाठी यंत्रांच्या वापरात वाढ
संजय तायडे
बोरगाव मंजू : चाराटंचाई आणि वाढत्या खर्चामुळे पशुधन बाळगणे शेतकऱ्यांसाठी जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पशुधनाची संख्या घसरल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. शेतीपूरक व्यवसाय राबविण्यासाठी पशुधन हा उत्तम पर्याय मानला जातो. मात्र, शेती मशागतीसाठी आता ट्रॅक्टरचा वापर वाढल्याने बैलजोडी व इतर गुरांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.
पारंपरिक शेती करताना दिवसेंदिवस नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक घडी सुधारण्यासाठी पूरक व्यवसाय करण्याची गरज आहे. शेतीबरोबरच जोड व्यवसाय म्हणून पशुसंवर्धन आणि संगोपन करणे गरजेचे आहे; परंतु अलीकडच्या काळात पशुधनाची संख्या घसरणीवर असल्याचे वास्तव चित्र आहे.
बोरगाव मंजू पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत बोरगाव मंजू, वाशिंबा, वणी रंभापूर आणि निपाणा या गावांचा समावेश आहे. या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत विविध शासकीय योजना राबविण्यासह वैद्यकीय उपचार, औषधोपचार, खच्चीकरण, लसीकरण, शस्त्रक्रिया, कृत्रिम रेतन, गर्भधारणा तपासणी, वंध्यत्व तपासणी आदी सेवा राबविल्या जातात. तसेच १०० टक्के अनुदानावर चारा पिके व बियाण्यांचे वाटप, वेळोवेळी पशुपालकांसाठी दुग्ध उत्पादन वाढीसाठी कार्यशाळा तसेच मार्गदर्शनही करण्यात येते.
अशी आहे पशुधनाची संख्या (२०वी पशुगणना)
बोरगाव मंजू : गाय वर्ग २३१३, म्हैस वर्ग ४०३, शेळ्या १३१४, मेंढ्या १९३
निपाणा : गाय वर्ग २१८, म्हैस वर्ग २८, शेळ्या ६१
वणी रंभापूर : गाय वर्ग ११९, म्हैस वर्ग २८, शेळ्या ७३
वाशिंबा : गाय वर्ग २२७, म्हैस वर्ग ९२, शेळ्या १७४
एकूण पशुधन संख्या : ५२२७
उन्हाळ्याचे दिवस असल्याने जनावरांना विविध संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता वाढते. गोचीड, गोमाश्या तसेच साथीचे आजार उद्भवतात. उन्हाच्या तीव्रतेमुळे चारा व पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. पशुपालकांनी वेळीच दखल घेऊन पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत उपचार करून घ्यावेत. तसेच विदर्भ–मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेसाठी पशुवैद्यकीय दवाखान्यातून माहिती उपलब्ध करून दिली जाईल.शिवाय, जनावरांच्या कानातील बिल्ले, आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक यांची नोंद करून द्यावी, जेणेकरून पशुसंवर्धन विभागामार्फत विविध योजनांचा लाभ घेता येईल, असे आवाहन डॉ. विकास मुरलीधर लोंढे, पशुधन विकास अधिकारी, बोरगाव मंजू यांनी केले.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

