Staged his own kidnapping : आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी रायपूर येथील युवकाने स्वत:च्या अपहरणाचा बनाव केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मेहकर पोलिसांनी एका अहपरण प्रकरणाचा अवघ्या 24 तासात उलगडा करीत अपह्त युवकासह त्याच्या मित्राला अटक केली आहे. अपहरण झाल्याचे भासविणारा मुलगाच या कटाचा मुख्य सूत्रधार निघाल्याने खळबळ उडाली आहे.

मेहकर पोलिसांनी खंडणी प्रकरणाचा १२ तासांत केला उलगडा; दोघांना केली अटक
मेहकर : आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी रायपूर येथील युवकाने स्वत:च्या अपहरणाचा बनाव केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मेहकर पोलिसांनी एका अहपरण प्रकरणाचा अवघ्या 24 तासात उलगडा करीत अपह्त युवकासह त्याच्या मित्राला अटक केली आहे. अपहरण झाल्याचे भासविणारा मुलगाच या कटाचा मुख्य सूत्रधार निघाल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रायपूर ता. मेहकर येथील जनार्धन काळे यांनी ६ मे २०२६ रोजी मेहकर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यांचा मुलगा चेतन जनार्धन काळे (वय १९) हा बी.एस्सी. परीक्षेचा पेपर देण्यासाठी छगन भुजबळ महाविद्यालय, ब्रम्हपुरी फाटा, मेहकर येथे गेला होता. मात्र तो घरी परतला नाही.
दरम्यान, दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास जनार्धन काळे यांच्या मोबाईलवर चेतनच्या मोबाईलवरून एक व्हिडिओ आणि संदेश प्राप्त झाला. त्या व्हिडिओमध्ये चेतन याला बांधलेल्या अवस्थेत दाखविण्यात आले होते. तसेच “तुमचा मुलगा आमच्या ताब्यात असून त्याला जिवंत पाहायचे असल्यास ४० तोळे सोने घेऊन दोन तासांत शेगाव रेल्वे स्टेशन येथे एकटे या,” अशी धमकी देण्यात आली होती. या तक्रारीवरून मेहकर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी चेतनचे नातेवाईक, मित्र, शिक्षक यांची चौकशी केली. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे वेगवेगळी पथके विविध जिल्ह्यांत रवाना करण्यात आली.
तपासादरम्यान अपहृत चेतन काळे याला नाशिक जिल्ह्यातील वाकड, पोस्टे लासलगाव हद्दीतील एका शेतातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्यासोबत त्याचा मित्र विवेक सखाराम काकडे (वय २६, रा. पोखरी फाटा, हिवरा आश्रम, ता. मेहकर) हाही पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी दोघांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता, आर्थिक अडचणीमुळे त्यांनी बऱ्याच दिवसांपासून बनावट अपहरणाचा कट रचल्याची कबुली दिली. खंडणीच्या माध्यमातून मोठी रक्कम उकळण्याचा त्यांचा डाव असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात आणखी काही साथीदार असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा व अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत सपोनी संदीप बिरांजे, सपोनी अशोक अवचार, पोउपनि किरण खाडे, संदीप मेंढणे, सफौ सुखदेव गव्हाणे, पोहेका लक्ष्मण कटक, दिगांबर चव्हाण, विजय बेडवाल, मोहम्मद परसुवाले, केशव अवचार, विठ्ठल पैठणे आदींनी सहभाग घेतला.

