Buldhana Police face a dilemma: राजुरा शिवारात सापडलेल्या शिरविरहित महिलेच्या मृतदेह प्रकरणात मोठा धक्कादायक आणि तितकाच गोंधळ उडवणारा ट्विस्ट समोर आला आहे. ज्या तरुणीच्या खुनाचा आरोप ठेवत पोलिसांनी तिच्या वडिलांसह भावाला अटक केली, तीच तरुणी अचानक पोलीस ठाण्यात जिवंत हजर झाल्याने पोलिसांच्या तपास पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासावर प्रश्नचिन्ह ; जळालेला मृतदेह कोणाचा, शोध घेण्याचे आव्हान
जळगाव जामोद : राजुरा शिवारात सापडलेल्या शिरविरहित महिलेच्या मृतदेह प्रकरणात मोठा धक्कादायक आणि तितकाच गोंधळ उडवणारा ट्विस्ट समोर आला आहे. ज्या तरुणीच्या खुनाचा आरोप ठेवत पोलिसांनी तिच्या वडिलांसह भावाला अटक केली, तीच तरुणी अचानक पोलीस ठाण्यात जिवंत हजर झाल्याने पोलिसांच्या तपास पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात २५ एप्रिल रोजी एका महिलेचे शिर आणि धड वेगवेगळ्या अवस्थेत आढळून आले होते. या घटनेनंतर तपास यंत्रणांनी मध्यप्रदेशातील खकनार परिसर गाठत तेथील बेपत्ता तरुणीच्या नोंदीशी मृतदेहाची सांगड घातली. त्यानुसार, बेपत्ता शिवानी बापूराम कळमेकर हिचाच खून झाल्याचा निष्कर्ष काढत बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने तिच्या वडील आणि भावाला अटक केली होती.
दरम्यान, या कारवाईनंतर अवघ्या काही दिवसांतच कथित मृत शिवानी २७ मे रोजी मध्यप्रदेशातील खकनार पोलीस ठाण्यात हजर झाली. आपल्याच खुनाच्या आरोपाखाली वडील व भावाला अटक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना मुक्त करण्यासाठी आपण आल्याचे तिने पोलिसांना सांगितले. या घटनेमुळे पोलीस प्रशासनासह सर्वसामान्य नागरिकही चक्रावून गेले.
खकनार पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक जाधव यांनी याबाबतची माहिती जळगाव जामोदचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना दिल्यानंतर शिवानीला २८ मे रोजी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले. त्यानुसार शिवानी काही नागरिकांसह पोलीस ठाण्यात दाखल झाली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी महाजन आणि पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी तिचे जबाब नोंदविले.
शिवानीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध विवाह केल्यानंतर ती काही दिवस पतीसोबत नाशिक येथे राहत होती. दरम्यान, आपल्या खुनाच्या आरोपाखाली वडील आणि भावाला अटक झाल्याचे समजल्यानंतर ती परत आली असून त्यांची सुटका करण्याची मागणी तिने केली.
या संपूर्ण घडामोडीनंतर राजुरा शिवारात सापडलेले शिर आणि धड नेमके कुणाचे, हा प्रश्न अधिकच गूढ बनला आहे. तसेच प्राथमिक तपास, ओळख पटविण्याची प्रक्रिया आणि आरोपींविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून, तपास यंत्रणेच्या भूमिकेवर चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणी जळगाव जामोदचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.

