Fierce Opposition : अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला तीव्र विरोध दर्शवत बुलढाणा शहरातील समस्त अनुसूचित जाती प्रवर्गातील समाजघटक व आंबेडकरी समाजाच्या वतीने महाबोधी बुद्ध विहार, धम्मगिरी येथे चिंतन बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपवर्गीकरणाला घटनाबाह्य ठरवत संविधानिक हक्क व आरक्षणाच्या एकसंघ स्वरूपावर परिणाम होणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

‘आरक्षणाचे उपवर्गीकरण म्हणजे घटनात्मक हक्कांवर घाला’ : चिंतन बैठकीत मान्यवरांचा सूर
बुलढाणा : अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला तीव्र विरोध दर्शवत बुलढाणा शहरातील समस्त अनुसूचित जाती प्रवर्गातील समाजघटक व आंबेडकरी समाजाच्या वतीने महाबोधी बुद्ध विहार, धम्मगिरी येथे चिंतन बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपवर्गीकरणाला घटनाबाह्य ठरवत संविधानिक हक्क व आरक्षणाच्या एकसंघ स्वरूपावर परिणाम होणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
या बैठकीत गट-तट, पक्ष, व्यक्ती आणि नेतृत्व निरपेक्ष भूमिकेतून केवळ आंबेडकरवादी विचारांच्या आधारे चर्चा करण्यात आली. बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात आली असून मंगळवार, दि. २ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता समाजाच्या वतीने निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीत वक्त्यांनी सांगितले की, राज्यघटनेतील कलम ३४१ अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गाला आरक्षण देण्यात आले असून त्यात फेरबदल करण्याचे अधिकार संसदेला आहेत. तसेच राष्ट्रपतींच्या मंजुरीशिवाय अनुसूचीमध्ये बदल होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत उपवर्गीकरणाच्या माध्यमातून अनुसूचित जातींच्या हक्कांवर परिणाम होत असल्याची भूमिका उपस्थितांनी मांडली.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उपाध्यक्ष दादासाहेब काटकर म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जातींना एकसंघ करून संविधानिक हक्क व अधिकार दिले आहेत. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती ही आरक्षणामुळे शक्य झाली आहे. उपवर्गीकरण म्हणजे या एकतेत फूट पाडण्याचा प्रयत्न असून चर्मकार समाज याला मोठ्या प्रमाणावर विरोध करेल.”
सुमित सरदार यांनी सांगितले की, अनुसूचित जाती प्रवर्ग संविधानात एकसंघ समूह म्हणून समाविष्ट करण्यात आला असून उपवर्गीकरणामुळे समाजात भेद निर्माण होऊन जातींमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे याला विरोध कायम राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
कुणाल पैठणकर यांनी संविधानातील समानतेच्या तत्त्वांचा उल्लेख करत सांगितले की, कलम १४, १५ आणि १६ नुसार समानतेचा व समान संधीचा अधिकार देण्यात आला आहे. पुरेशा सामाजिक, शैक्षणिक व प्रतिनिधित्वाच्या आकडेवारीशिवाय उपवर्गीकरण करणे योग्य नसल्याचे त्यांनी मत व्यक्त केले. अनुसूचित जातींमधील विविध समाजघटक याला विरोध करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ज्येष्ठ नेते दत्ता हिवाळे यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व जातींनी एकत्र येऊन हक्क व अधिकारांच्या संरक्षणासाठी लढा उभारण्याचे आवाहन केले. भाई प्रदीप अंभोरे यांनीही उपवर्गीकरणाच्या विरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करत आरक्षण हे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगतीचे साधन असल्याचे सांगितले.
यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डी.आर. माळी, रमेश घेवंदे, शिवाजीराव गवई, शाहीर डी.आर. इंगळे, अशोक दाभाडे, प्रा. सरकटे, इंजिनिअर विजय मोरे, पी.आर. इंगळे, नगरसेवक अशोक इंगळे, जे.पी. वाकोडे, मिलिंद वानखडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली. बैठकीस बुलढाणा शहरातील आंबेडकरवादी अनुयायी व चर्मकार समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

