Nagesh Swami Maharaj :“अज्ञानातून ज्ञानप्राप्तीकडे वाटचाल करायची असेल, तर गुरूच्या सान्निध्यात जाणे आवश्यक आहे. गुरूच्या कृपेनेच शिष्याला दिव्य ज्ञान प्राप्त होते,” असा हितोपदेश शि. भ. प. नागेश स्वामी महाराज कुरुंदवाडीकर यांनी काल्याच्या कीर्तनातून भाविकांना केला. पलसिद्ध महास्वामी मठात पवित्र अधिक मासानिमित्त आयोजित अखंड शिवनाम सप्ताहाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

पलसिद्ध महास्वामी मठात शिवनाम सप्ताहाची भक्तीमय सांगता; गुरुवर्यांची भव्य मिरवणूक
साखरखेर्डा : “अज्ञानातून ज्ञानप्राप्तीकडे वाटचाल करायची असेल, तर गुरूच्या सान्निध्यात जाणे आवश्यक आहे. गुरूच्या कृपेनेच शिष्याला दिव्य ज्ञान प्राप्त होते,” असा हितोपदेश शि. भ. प. नागेश स्वामी महाराज कुरुंदवाडीकर यांनी काल्याच्या कीर्तनातून भाविकांना केला. पलसिद्ध महास्वामी मठात पवित्र अधिक मासानिमित्त आयोजित अखंड शिवनाम सप्ताहाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
‘सिद्ध नाम घेता कार्य सिद्ध होय, धरावे ते पाय वेगी प्रेमे’ या अभंगाच्या माध्यमातून प्रबोधन करताना महाराज म्हणाले की, “सिद्ध नामाचा महिमा अत्यंत मोठा आहे. नामस्मरणाने केवळ कार्य सिद्ध होत नाही, तर पतितांचाही उद्धार होतो. गुरूप्रसादामुळे काम, क्रोध, मद, मत्सर यांसारख्या दुर्गुणांचा नाश होतो. त्यामुळे प्रत्येकाने गुरूच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक वाटचाल करावी.”
ते पुढे म्हणाले की, जीवनातील दुःख, व्यथा आणि मानसिक अस्वस्थता कमी करण्यासाठी शिवपुराण कथा ऐकणे आवश्यक आहे. वारकरी संप्रदायात जसे ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते, त्याचप्रमाणे वीरशैव संप्रदायात मन्मथ स्वामी यांनी पाया रचला, तर लक्ष्मण महाराजांनी त्याचा विस्तार केला, असे त्यांनी सांगितले.
पलसिद्ध महास्वामी मठात दि. २१ ते २७ मे दरम्यान अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या काळात दररोज शिवमहापुराण कथा व विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. आळंदी देवाची येथील हभप. प्रेममूर्ती जगदिशानंद शास्त्री यांच्या अमृतमय वाणीतून भाविकांना शिवपुराण कथेचा लाभ मिळाला. दि. २४ मे रोजी गुरूमंत्र सोहळा व शिवदीक्षा संस्कार विधी पार पडला.
समारोपाच्या दिवशी पलसिद्ध महास्वामींच्या पादुकांची गावातील प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिला-पुरुषांसह अनेक भाविक सहभागी झाले होते. गुरुवर्य रथावर आरूढ झाले असताना ठिकठिकाणी पुष्पवृष्टी व पाद्यपूजन करण्यात आले.
यावेळी ष.ब्र.१०८ वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य महाराज, मठाधिपती सद्गुरू सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज, शिवचैतन्य शिवाचार्य महाराज, विश्वचैतन्य शिवाचार्य महाराज, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, अमित जाधव, भाजप प्रदेश प्रतिनिधी रावसाहेब देशपांडे, माजी सरपंच महेंद्र पाटील, संदीप मगर, अशोक इंगळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महाप्रसाद वितरणाने या भक्तिमय सोहळ्याची सांगता झाली.

