Scorpio overturns : समृद्धी महामार्गाच्या नागपूर कॉरिडोरवरील चॅनल क्रमांक ३२५.३ येथे स्कॉर्पिओ कारचे टायर फुटल्याने कार पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात एक जण गंभीर, तर नऊ जण किरकोळ जखमी झाले. हा अपघात २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३५ वाजण्यापूर्वी घडला.

समृद्धी महामार्गावर काळाचा घाला; टायर फुटल्याने स्कॉर्पिओ पलटी, १० जखमी
फकीरा पठाण
मलकापूर पांग्रा : समृद्धी महामार्गाच्या नागपूर कॉरिडोरवरील चॅनल क्रमांक ३२५.३ येथे स्कॉर्पिओ कारचे टायर फुटल्याने कार पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात एक जण गंभीर, तर नऊ जण किरकोळ जखमी झाले. हा अपघात २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३५ वाजण्यापूर्वी घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील सीआरओकडून समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ३२५.३ येथे अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर समृद्धी महामार्ग उपकेंद्राचे पोलीस पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. पोलीस उपनिरीक्षक अनिता इर्शीद यांच्या नेतृत्वाखालील पथक दुपारी १२.०५ वाजता घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी स्कॉर्पिओ कार क्रमांक सीजी ०८ बीसी ४४०५ ही रस्त्यावर पलटी झालेल्या अवस्थेत आढळून आली.
कारचालक हेमंत विश्वकर्मा (वय २४, रा. राजनांदगाव, छत्तीसगड) यांच्याकडे चौकशी केली असता, ते आपल्या मित्रांसह नाशिकहून नागपूरकडे जात असल्याचे सांगितले. प्रवासादरम्यान कारच्या पाठीमागील डाव्या बाजूचे टायर अचानक फुटले. त्यामुळे कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार पलटी होऊन हा अपघात झाला.
अपघातात अमन साहू (वय २५) यांना गंभीर दुखापत झाली असून तीकेस बंदे, रवी साहू, यश साहू, देवेश साहू, हेमंत विश्वकर्मा, वासू साहू, विकी साहू, किशन विश्वकर्मा आणि नवीन साहू यांना किरकोळ दुखापत झाली. जखमींना ॲम्ब्युलन्सच्या मदतीने उपचारासाठी शासकीय रुग्णालय, सिंदखेडराजा येथे हलविण्यात आले.
क्रेनच्या सहाय्याने वाहन हटविले
अपघातग्रस्त स्कॉर्पिओ क्रेनच्या सहाय्याने हटवून दुसरबीड टोलनाका येथे लावण्यात आली. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू राहिली असून घटनास्थळी शांतता असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस पथकाने दुपारी १.२५ वाजता कारवाई पूर्ण केली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अनिता इर्शीद, पोलीस कॉन्स्टेबल धीरेंद्र चंदन , सागर कोल्हे , शिवाजी बारगजे, सागर कुटे , गजानन जाधव तसेच एमएसएफ आणि क्यूआरव्ही पथकातील जवान सहभागी झाले होते.

