Devanand Gahile: महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेची महत्त्वपूर्ण सभा शनिवारी, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी पातूर येथील शासकीय विश्रामगृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेत पातूर तालुका अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार देवानंद गहिले, तर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार रमेश भाऊ देवकर यांची सर्वानुमते व अविरोध निवड करण्यात आली.

पत्रकारांच्या प्रश्नांसाठी एकजुटीचा निर्धार; पातूर ग्रामीण पत्रकार संघटनेची नवी कार्यकारिणी
निशांत गवई
पातूर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेची महत्त्वपूर्ण सभा शनिवारी, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी पातूर येथील शासकीय विश्रामगृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेत पातूर तालुका अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार देवानंद गहिले, तर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार रमेश भाऊ देवकर यांची सर्वानुमते व अविरोध निवड करण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अनिल जैन होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गजानन भाऊ वाघमारे तसेच सुप्रसिद्ध प्रा. अशोक शिरसाट उपस्थित होते.
सभेत पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर, ग्रामीण भागातील पत्रकारांसमोरील अडचणींवर तसेच पत्रकार संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या हक्कांसाठी प्रभावीपणे काम करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पत्रकारांनी एकजुटीने कार्य करून ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या आणि पत्रकारांच्या प्रश्नांना शासन व प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
नवनियुक्त तालुका अध्यक्ष देवानंद गहिले आणि उपाध्यक्ष रमेश देवकर यांचे उपस्थित पत्रकारांनी उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष गजानन भाऊ वाघमारे यांच्या हस्ते नवनियुक्त तालुका अध्यक्ष देवानंद गहिले यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या सभेला ज्येष्ठ पत्रकार इरफान शेख, संजय गोतरकर, रमेश नीलखन, राजेश अवचार, सय्यद हसन बाबू, जनार्दन हिरळकर, राहुल सोनोणे, पूर्णाजी खोडके, प्रा. घारे, गोपाल सातव, श्री. राठोड, वसीम शेख, उज्ज्वल कुमार शिरसाट यांच्यासह ग्रामीण पत्रकार संघटनेचे पदाधिकारी आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्येष्ठ पत्रकार प्रदीप देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली
सभेच्या प्रारंभी पातूर येथील ज्येष्ठ पत्रकार प्रदीप भाऊ देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. दैनिक लोकमत आणि दैनिक देशोन्नती या वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात दीर्घकाळ अविरतपणे कार्य केले. त्यांच्या निधनाने पातूरच्या पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली असून, त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा उपस्थितांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने दिवंगत पत्रकार प्रदीप देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
शोकसभेचे सूत्रसंचालन नवनियुक्त तालुका अध्यक्ष देवानंद गहिले यांनी केले. पत्रकारांच्या एकजुटीला अधिक बळ देत ग्रामीण भागातील पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार सभेत करण्यात आला.

