Akola RTO: ८०व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘हर घर तिरंगा अभियान-२०२६’ अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय, अकोला यांच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रध्वजाचा सन्मान, वाहतूक नियमांचे पालन आणि सुरक्षित प्रवासाचा संदेश देणारी ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून उत्साहात पार पडली.

राष्ट्रध्वजाच्या सन्मानातून रस्ता सुरक्षेचा संदेश; हेल्मेटधारी नागरिकांच्या सहभागाने RTO ची रॅली
आगाखान पठाण
अकोला : ८०व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘हर घर तिरंगा अभियान-२०२६’ अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय, अकोला यांच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रध्वजाचा सन्मान, वाहतूक नियमांचे पालन आणि सुरक्षित प्रवासाचा संदेश देणारी ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून उत्साहात पार पडली.
प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार आणि सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. कौलखेड चौक, बसस्थानक, टॉवर चौक, नेकलेस मार्ग आणि गोरक्षण रोड असा रॅलीचा मार्ग होता. मार्गावर नागरिकांनी तिरंग्याचे उत्स्फूर्त स्वागत केले.
रॅलीमध्ये सहभागी दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करून ‘सुरक्षित वाहनचालक, सुरक्षित कुटुंब आणि सुरक्षित भारत’चा संदेश दिला. मोटार ड्रायव्हिंग स्कूल, वाहन वितरक, ॲम्बुलन्स सेवा तसेच विविध स्तरांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. हेल्मेटचा वापर, वाहतूक नियमांचे पालन, जबाबदार वाहनचालकाची भूमिका आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यक दक्षता याबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली.
रॅली केवळ घोषणांपुरती मर्यादित न ठेवता नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा उपक्रमही राबविण्यात आला. मोटार वाहन निरीक्षक त्रिवेणी घोलप आणि किरण कुमार लोणी यांनी रस्त्याच्या कडेला उपस्थित नागरिकांशी संवाद साधत हेल्मेट वापर, वाहतूक नियमांचे पालन आणि सुरक्षित प्रवासाबाबत त्यांच्या अडचणी व सूचना जाणून घेतल्या. ‘दंडाच्या भीतीने नव्हे, तर स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे पालन करा,’ असा संदेश यावेळी देण्यात आला.
रॅलीच्या नियोजनासाठी मोटार वाहन निरीक्षक त्रिवेणी घोलप, अक्षय ईश्वरी आणि रोशन आचरेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. मोटार वाहन निरीक्षक किरण कुमार लोणी, अनिरुद्ध देवधर, संदीप तायडे, मनोज शेळके, गौरव तेलराधे, सुरेश शिंदे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रियंका राऊत, मनीषा पांचाळ, स्नेहल पुरी, ममता इंगोले, नीलम सैनानी, गौरव गिरी, विनोद जाधव, प्रसन्न टिकर तसेच कार्यालयातील सर्व चालकांनी रॅलीत सक्रिय सहभाग नोंदविला.
‘हर घर तिरंगा’सोबत ‘हर प्रवास सुरक्षित’ हा संदेश देत रॅलीची सांगता प्रादेशिक परिवहन कार्यालय, अकोला येथे करण्यात आली. स्वातंत्र्यदिनाचा राष्ट्राभिमान आणि रस्ता सुरक्षेची सामाजिक जबाबदारी यांचा संगम साधणारा हा उपक्रम नागरिकांसाठी जनजागृतीचा प्रभावी संदेश ठरला.

