Mahabreaking

[breaking_news]

Retired employees :नगराध्यक्षांच्या लेखी आश्वासनाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या उपोषणाची सांगता

Retired employees : सेवानिवृत्तीनंतर प्रलंबित असलेले उपदान आणि रजा रोखीकरणाची रक्कम मिळावी, या मागणीसाठी नगरपरिषदेचे सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता भगवान महादू भगत आणि सेवानिवृत्त लिपिक राजेंद्र बळीराम गोरे यांनी १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणस्थळी नगराध्यक्षा सौ. माधुरी तुषार शिपणे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. तसेच निधी उपलब्ध होताच टप्प्याटप्याने देण्याचे आश्वासन दिल्याने उपोषणकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. आंदोलकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार मनोज कायंदे यांनीही पुढाकार घेतला आहे.

Retired employees

आमदार मनोज कायंदे यांनी घेतला पुढाकार ; निधी उपलब्ध होताच टप्प्याटप्प्याने देणी देण्याचे आश्वासन

गजानन तिडके

देऊळगाव राजा : सेवानिवृत्तीनंतर प्रलंबित असलेले उपदान आणि रजा रोखीकरणाची रक्कम मिळावी, या मागणीसाठी नगरपरिषदेचे सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता भगवान महादू भगत आणि सेवानिवृत्त लिपिक राजेंद्र बळीराम गोरे यांनी १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणस्थळी नगराध्यक्षा सौ. माधुरी तुषार शिपणे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. तसेच निधी उपलब्ध होताच टप्प्याटप्याने देण्याचे आश्वासन दिल्याने उपोषणकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. आंदोलकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार मनोज कायंदे यांनीही पुढाकार घेतला आहे.

नगराध्यक्षा शिपणे यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली असता, प्रलंबित रक्कम अदा करण्यासाठी सध्या पुरेसा निधी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. निधी उपलब्ध होताच प्रलंबित रक्कम टप्प्याटप्प्याने अदा करण्यात येईल, असे मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. उपोषणकर्त्यांनी विलंबित रकमेवर व्याजासह देयकाची मागणी केली आहे. यासंदर्भात न्यायालयीन आदेश प्राप्त झाल्यास व्याजाची रक्कम अदा करता येईल, अशी भूमिका प्रशासनाकडून मांडण्यात आली.

दरम्यान, उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाच्या W.P. No. 309/2022 प्रकरणातील १ एप्रिल २०२२ रोजीच्या आदेशाचा संदर्भ देत विलंबित सेवानिवृत्ती लाभावर व्याज देण्याबाबत न्यायालयीन निर्देश असल्याचे नगराध्यक्षांच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या मागणीवरही प्रशासनाने कायदेशीर बाबींचा विचार करावा, अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.

नगरपरिषदेचे लेखापाल यांच्याशी चर्चा केली असता, अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून त्यांची सुमारे दोन कोटी रुपयांची देणी प्रलंबित असल्याची माहिती समोर आली. नगरपरिषदेकडे निधीअभावी ही देणी थकली असून, निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे लेखापालांनी सांगितले. संबंधित प्रस्ताव १७ ऑगस्ट रोजी तयार करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे नगराध्यक्षांनी पत्रात नमूद केले आहे. तसेच नगरपरिषदेच्या उपलब्ध निधीतून आवश्यक रक्कम जमा ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

आस्थापना प्रमुख श्री. मुळे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर प्रलंबित सेवानिवृत्ती लाभांसाठी निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सुधारित प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची तयारी करण्यात आली आहे. हा प्रस्ताव तीन-चार दिवसांत तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, ही संपूर्ण परिस्थिती स्थानिक आमदार मनोज कायंदे यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आली. प्रलंबित देणी अदा करण्यासाठी प्रस्ताव तयार करून १८ ऑगस्ट रोजी सादर करण्याच्या सूचना आमदारांनी दिल्याचे नगराध्यक्षांनी पत्रात नमूद केले आहे. प्रस्तावाचा पाठपुरावा स्वतः करून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, तसेच त्यापूर्वीच नगरपरिषदेकडे निधी उपलब्ध झाल्यास उपोषणकर्त्यांना रक्कम अदा करण्याची कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले.

नगराध्यक्षांनी उपोषणकर्त्यांना या सर्व बाबींची माहिती देऊन त्यांना आमरण उपोषण मागे घेण्याची विनंती केली. नगरपरिषदेकडून पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही देण्यात आली. त्यामुळे उपोषण कर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

यावेळी माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, दिलीप झोटे, सुनील शेजुळकर, गट नेते प्रदीप वाघ, धनसिंग सिपने, यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top