Attempt to outrage : तालुक्यातील गिरोली बु. येथे एका ३५ वर्षीय महिलेचा वाईट उद्देशाने विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या प्रकाराला विरोध करून मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला शिवीगाळ करत त्याच्या पायावर दगड मारून जखमी केल्याचा तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

गिरोली बु. येथे महिलेची छेड काढल्याचा आरोप; विरोध करणाऱ्याला दगड मारून धमकी
देऊळगाव राजा: तालुक्यातील गिरोली बु. येथे एका ३५ वर्षीय महिलेचा वाईट उद्देशाने विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या प्रकाराला विरोध करून मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला शिवीगाळ करत त्याच्या पायावर दगड मारून जखमी केल्याचा तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी २३ वर्षीय तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ३५१(२) व ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या मूळच्या जळगाव जिल्ह्यातील असून सध्या गिरोली बु. येथे वास्तव्यास आहेत. १४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास त्या घरी असताना आरोपी अभिजीत अनिल सरकटे हा तेथे आला. त्याने वाईट उद्देशाने महिलेच्या छातीला हात लावून तिच्या अंगावर हात फिरविण्यास सुरुवात केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यावेळी आरोपीने तिला पलंगावर बसवून शांत करण्याचा प्रयत्न केला. ‘आरडू नको,’ असे म्हणत तिला धमकावल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, गौतम वाहुळ हा तेथे आला असता त्याने या प्रकाराला विरोध केला. यावेळी आरोपीने गौतम वाहुळ याला शिवीगाळ केली. त्यानंतर घटनास्थळी असलेला दगड उचलून त्याच्या पायावर मारल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर ‘तुला बघून घेईल,’ अशी धमकी देऊन आरोपी तेथून निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर महिलेने देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात दिलेल्या तोंडी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांच्या आदेशाने पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय गोरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक नितीन मिंड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. १५ ऑगस्ट रोजी रात्री १०.४० ते ११.२० वाजेदरम्यान पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्याची नोंद आहे. या प्रकरणाचा पुढील तपास देऊळगाव राजा पोलिस करीत आहेत.

