Mahabreaking

[breaking_news]

Reserve the open plots :गायत्री नगरातील खुले भुखंड खेळाच्या मैदानासाठी राखीव ठेवा

Reserve the open plots : गायत्री नगर, हिंगणा रोड परिसरातील लहान मुलांसाठी राखीव असलेल्या खेळाच्या मैदानावर प्रस्तावित  बांधकामाला स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शविला असून या संदर्भात अकोला महानगरपालिका आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

Reserve the open plots

नागरिकांची धार्मिक बांधकामाविरोधात भूमिका : महानगर पालिका आयुक्तांना दिले निवेदन

अकोला :  गायत्री नगर, हिंगणा रोड परिसरातील लहान मुलांसाठी राखीव असलेल्या खेळाच्या मैदानावर प्रस्तावित  बांधकामाला स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शविला असून या संदर्भात अकोला महानगरपालिका आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

नागरिकांनी दिलेल्या निवेदनानुसार, उदय कॉलनीतील सर्व्हे क्रमांक ९/२९ अंतर्गत असलेली राखीव जागा (क्रमांक २२७) ही लहान मुलांच्या खेळासाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या फिरण्यासाठी राखून ठेवण्यात आली आहे. मात्र, या जागेवर काही व्यक्तींकडून नवीन मंदिर उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, सोसायटीतील काही मोजक्या लोकांच्या सह्या घेऊन या ठिकाणी अवैधरित्या धार्मिक बांधकाम करण्याचा प्रयत्न होत असून त्याला परिसरातील अनेक नागरिकांचा विरोध आहे. या परिसरात विविध धर्म व जातींचे नागरिक सलोख्याने वास्तव्यास असून सार्वजनिक जागेवर धार्मिक स्थळ उभारल्यास सामाजिक एकोपा व सर्वधर्मसमभावाच्या वातावरणाला बाधा पोहोचू शकते, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, संबंधित जागा सार्वजनिक स्वरूपाची असून ती लहान मुलांच्या खेळासाठी आरक्षित असल्याचे महसुली अभिलेख व पूर्वीच्या प्रशासकीय आदेशांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या जागेचा मूळ उद्देश बदलल्यास मुलांच्या खेळण्याचा हक्क हिरावला जाईल आणि परिसरातील नागरिकांची गैरसोय होईल.

याशिवाय, प्रस्तावित बांधकामामुळे भविष्यात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही नागरिकांनी म्हटले आहे. सदर जागा रहदारीच्या मार्गालगत असल्याने धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी गर्दी वाढून वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. तसेच निवासी भागात धार्मिक स्थळ उभारल्यास ध्वनीप्रदूषण वाढून परिसरातील शांततेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाकडे सदर जागेवर कोणतेही धार्मिक स्थळ उभारण्यास परवानगी देऊ नये आणि ती जागा ज्या मूळ उद्देशासाठी आरक्षित करण्यात आली आहे त्याच उद्देशासाठी वापरात ठेवावी, अशी मागणी केली आहे. कायदा व सुव्यवस्था तसेच सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रस्तावित बांधकाम थांबवावे, अशी विनंतीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे परिसरात चर्चा रंगली असून महानगरपालिका प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top