Repaying the debt: अकोला शहरापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या काटेपूर्णा येथील संत गजानन महाराज विद्यालयाच्या दुरवस्थेने अस्वस्थ झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत शाळेचे रूपडेच पालटले आहे. ज्या शाळेने आपल्याला जीवनाला दिशा दिली, तिच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी वर्गणी गोळा करून आतापर्यंत सुमारे १९ लाख रुपयांचा खर्च केला असून, या उपक्रमातून त्यांनी समाजऋण फेडण्याचा आदर्श घालून दिला आहे.

माजी विद्यार्थ्यांची अनोखी गुरुदक्षिणा; वर्गणीतून शाळेचा कायापालट, १९ लाखांचा निधी
आगाखान पठाण
अकोला : अकोला शहरापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या काटेपूर्णा येथील संत गजानन महाराज विद्यालयाच्या दुरवस्थेने अस्वस्थ झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत शाळेचे रूपडेच पालटले आहे. ज्या शाळेने आपल्याला जीवनाला दिशा दिली, तिच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी वर्गणी गोळा करून आतापर्यंत सुमारे १९ लाख रुपयांचा खर्च केला असून, या उपक्रमातून त्यांनी समाजऋण फेडण्याचा आदर्श घालून दिला आहे.

काटेपूर्णा येथील संत गजानन महाराज विद्यालयाची स्थापना १९६८ मध्ये झाली. मात्र, संस्थेतील वादविवाद आणि प्रशासकीय दुर्लक्षाचा परिणाम शाळेच्या विकासकामांवर झाला. त्यामुळे भौतिक सुविधांचा अभाव निर्माण होऊन शाळेचा विकास खुंटला. अनेक वर्षांपासून प्रशासक नियुक्त असतानाही मूलभूत सुविधांकडे अपेक्षित लक्ष न दिल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.
शाळेची ही अवस्था पाहून माजी विद्यार्थी बबन अभिमान सदाशिव आणि अनंत देशमुख अस्वस्थ झाले. त्यांनी माजी विद्यार्थी संघ स्थापन करून शाळेच्या विकासासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणले. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या माजी विद्यार्थ्यांनी एकमताने या उपक्रमाला प्रतिसाद देत आर्थिक मदत करण्यास सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नांतून शाळेच्या विकासकामांना गती मिळाली.
माजी विद्यार्थ्यांनी शाळेवर नवीन टिनपत्रे बसविणे, विद्युत फिटिंग करणे, नवीन पंखे बसविणे, वृक्षारोपण व फळबाग तयार करणे, फरशीचे काम, बेंचची दुरुस्ती, प्रवेशद्वाराची निर्मिती, शाळेच्या आवाराचे सुशोभीकरण, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आणि रंगरंगोटी अशी विविध कामे केली आहेत. आतापर्यंत सुमारे १९ लाख रुपये शाळेच्या विकासासाठी खर्च करण्यात आले असून, माजी विद्यार्थ्यांकडून सुमारे साडेआठ लाख रुपये जमा झाले आहेत. उर्वरित रक्कमही जमा करण्याचे काम सुरू आहे.
या विकासकामांचे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून लोकार्पण करण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक सीमा जवरे उद्घाटक म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रफुल्ल डिखोळे होते, तर आमदार हरीश पिंपळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. माजी जिल्हा परिषद सदस्य छाया देशमुख, माजी विद्यार्थी संघाचे बबन सदाशिव व अनंत देशमुख, कृषी विभागाचे पंकज जगताप, उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक शेख अनिस, गिरधर भोंडे, श्याम शर्मा, अण्णा उमाळे, बाभूळगाव जहागीरचे माजी सरपंच आगाखान पठाण, अजय राऊत, सुरेश चव्हाण, शाळेचे मुख्याध्यापक सोळंके सर, विजय मालटे, दहीकर, अतुल घरडे, टाकसेन सदाशिव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन उगले सर यांनी केले, तर आभार प्रफुल्ल डिखोळे यांनी मानले.
माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेच्या विकासासाठी केलेले हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे उपस्थितांनी सांगितले. प्रत्येक गावातील माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेप्रती असलेले ऋण व्यक्त करण्यासाठी अशा उपक्रमांचे अनुकरण करावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

