Mahabreaking

[breaking_news]

  Raj, engrossed in conversations :नव्या शाळेच्या गप्पांत रमलेला राज मध्यरात्री काळाच्या पडद्याआड; राजगड गाव शोकमग्न

Raj, engrossed in conversations : मेहकर तालुक्यातील राजगड येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून, शाळेचा पहिलाच दिवस मोठ्या आनंदात घालवून आलेल्या एका ६ वर्षीय चिमुकल्याचा रात्री झोपेत सर्पदंशाने मृत्यू झाला. दवाखान्यात उपचारासाठी नेत असतानाच रस्त्यात त्याची प्राणज्योत मालवली. राज अभिषेक राठोड असे मृत बालकाचे नाव असून, या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण राजगड गावावर शोककळा पसरली आहे.

  Raj, engrossed in conversations

  पहिल्या शाळेच्या आनंदावर दुःखाचा डोंगर; झोपेत सर्पदंश होऊन चिमुकल्या राजचा मृत्यू

डोणगाव : मेहकर तालुक्यातील राजगड येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून, शाळेचा पहिलाच दिवस मोठ्या आनंदात घालवून आलेल्या एका ६ वर्षीय चिमुकल्याचा रात्री झोपेत सर्पदंशाने मृत्यू झाला. दवाखान्यात उपचारासाठी नेत असतानाच रस्त्यात त्याची प्राणज्योत मालवली. राज अभिषेक राठोड असे मृत बालकाचे नाव असून, या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण राजगड गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेहकर तालुक्यातील बंजारा समाजबहुल राजगड येथील रहिवासी अभिषेक राठोड यांनी आपल्या ६ वर्षीय मुलगा राजचे २ जुलै रोजी डोणगाव येथील जीवन विकास कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेतला होता. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने राज अतिशय आनंदात होता. नवीन शाळा, नवीन वर्ग, नवीन मित्र आणि दिवसभरात घडलेल्या गमतीजमती तो घरी आल्यानंतर आई-वडिलांना मोठ्या उत्साहाने सांगत होता. सकाळी पुन्हा शाळेत जायचे आहे, या आनंदातच रात्री जेवण आटोपल्यानंतर तो आई आणि लहान बहीण अक्षरा हिच्यासोबत एकाच बेडवर झोपला. शाळेच्या गप्पा मारता मारता आईजवळ गाढ झोपलेल्या त्या निष्पाप लेकराचा हा शेवटचा दिवस ठरेल, याची कल्पनाही कुणाला नव्हती.

३ जुलैच्या मध्यरात्री सुमारे १२ वाजताच्या सुमारास अचानक वीजपुरवठा खंडित झाला. उकाडा प्रचंड असल्याने घरात हवा यावी म्हणून वडील अभिषेक राठोड यांनी घराचा दरवाजा उघडा ठेवला. याच दरम्यान घरात शिरलेल्या एका विषारी सापाने झोपलेल्या राजच्या पायाला दंश केला. रात्री सुमारे १ वाजताच्या सुमारास राज झोपेतून उठला आणि वेदनेने रडू लागला. आई-वडिलांनी पाहिले असता त्याच्या पायाला काहीतरी चावल्याचे दिसून आले. सुरुवातीला उंदीर किंवा इतर एखादा लहान जीव चावला असावा, असा समज करून त्यांनी त्याला जवळ घेत शांत केले.

मात्र, रात्री २ ते २.३० वाजताच्या दरम्यान राजच्या वेदना असह्य होऊ लागल्या. त्याचा पाय हळूहळू निळा पडू लागल्याने परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात आले. सापाचे विष शरीरात पसरत असल्याची शंका येताच घाबरलेल्या आई-वडिलांनी गावकऱ्यांच्या मदतीने त्याला तातडीने उपचारासाठी डोणगाव येथील रुग्णालयात नेण्यास सुरुवात केली. परंतु, विष मोठ्या प्रमाणात शरीरात पसरल्याने दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच रस्त्यातच चिमुकल्या राजची प्राणज्योत मालवली.

सकाळी राजचा मृत्यू सर्पदंशामुळे झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गावकऱ्यांनी घरात पाहणी केली. त्यावेळी राज ज्या पलंगावर झोपला होता, त्या पलंगाजवळील एका खोक्यात तो विषारी साप लपून बसलेला आढळून आला. गावकऱ्यांनी त्याला बाहेर काढले.

कालपर्यंत नव्या शाळेच्या आनंदात हरवलेला, मित्र-शिक्षकांच्या गोष्टी सांगणारा निष्पाप राज आज कायमचा निघून गेल्याने राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलाच्या पहिल्या शाळेच्या दिवसाचा आनंद साजरा करणाऱ्या कुटुंबावर काही तासांतच काळाने घाला घातल्याने संपूर्ण राजगड गाव सुन्न झाले आहे. या घटनेमुळे मेहकर तालुक्यासह परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top