Raids conducted: मेहकर व सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथे अवैधरीत्या सुरू असलेल्या बायोडिझेल पंपांवर अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत २१ लाख ६९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यामध्ये मालमोटार ट्रकसह बायोडिझेलसदृश पेट्रोलियम द्रव पदार्थाचा साठा, भूमिगत लोखंडी टाक्या, डिस्पेन्सर युनिट, पाईप व इतर साहित्याचा समावेश आहे.

अवैध बायोडिझेल साठ्यावर राज्यस्तरीय दक्षता पथकाची धडक कारवाई; ट्रकसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
साखरखेर्डा : मेहकर व सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथे अवैधरीत्या सुरू असलेल्या बायोडिझेल पंपांवर अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत २१ लाख ६९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यामध्ये मालमोटार ट्रकसह बायोडिझेलसदृश पेट्रोलियम द्रव पदार्थाचा साठा, भूमिगत लोखंडी टाक्या, डिस्पेन्सर युनिट, पाईप व इतर साहित्याचा समावेश आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नियंत्रक शिधावाटप व राज्यस्तरीय दक्षता पथकाचे प्रमुख चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मेहकर येथील वृंदावन लॉन्सजवळ, हॉटेल बंजारासमोर छत्रपती शिवाजी महाराज बायपास रोडवरील मोकळ्या जागेत तसेच सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथील हॉटेल गावकरी फॅमिली रेस्टॉरंटसमोरील ठिकाणी अवैध बायोडिझेल पंपावर छापा टाकण्यात आला.
या कारवाईदरम्यान अशोक लेलँड कंपनीचा ट्रक, भूमिगत लोखंडी टाक्या, डिस्पेन्सर युनिट, डिझेलसदृश साठा, पाईप व अन्य साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असून, पुढील तपास स्थानिक पोलीस व पुरवठा विभागाकडून करण्यात येत आहे.
जप्त करण्यात आलेला बायोडिझेलसदृश पेट्रोलियम द्रव पदार्थ नेमका कोठून आणण्यात आला, त्याचा पुरवठा कोण करीत होते आणि या अवैध व्यवसायामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास प्रशासनाकडून करण्यात येत आहे.या कारवाईत राज्य दक्षता पथकातील उपनियंत्रक शिधावाटप अंमलबजावणी गणेश बेल्लाळे, सहायक नियंत्रक शिधावाटप प्रदीप काळे, मुख्य निरीक्षण अधिकारी नागनाथ हंगरगे तसेच शिधावाटप निरीक्षक राजेश सोरते, अरुण काते, विकास नागदिवे, पवन कुंभले, रविंद्र राठोड, राजीव भेले, देवानंद थोरवे, रामराजे भोसले, दिपेंद्र परूळेकर, अमोल बुरटे, चंद्रकांत कांबळे व राहूल इंगळे यांच्यासह पुरवठा निरीक्षण अधिकारी नहुशकुमार बोरोडे, शुभम फाले, पुरवठा निरीक्षक विवेक जगताप, सुनील झाल्टे व गोदाम लिपिक विशाल लोखंडे सहभागी झाले. अवैध इंधन तसेच गॅस तस्करीसारख्या गैरप्रकारांविरोधात यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा चंद्रकांत डांगे (भा.प्र.से.) यांनी दिला आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

