Mahabreaking

[breaking_news]

Queues for diesel :साखरखेर्डा येथील पेट्रोल पंपावर डिझेलसाठी रांगा; वाहनांसोबत ड्रम, कॅनही लाईनमध्ये

Queues for diesel :गेल्या दोन महिन्यांपासून देशभरात इंधनटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत असून, त्याचा सर्वाधिक फटका शेतीशी संबंधित कामांवर होत आहे. विशेषतः ट्रॅक्टर चालक आणि शेतकऱ्यांना डिझेलच्या कमतरतेमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या प्रत्येक पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

Queues for diesel

अशोक इंगळे

साखरखेर्डा : गेल्या दोन महिन्यांपासून देशभरात इंधनटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत असून, त्याचा सर्वाधिक फटका शेतीशी संबंधित कामांवर होत आहे. विशेषतः ट्रॅक्टर चालक आणि शेतकऱ्यांना डिझेलच्या कमतरतेमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या प्रत्येक पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

साखरखेर्डा येथे दोन पेट्रोल पंप असून, चार दिवसांनंतर पेट्रोल व डिझेलचा टँकर दाखल होत असल्याची माहिती आहे. एका वेळी सुमारे ३ हजार लिटर पेट्रोल आणि ९ हजार लिटर डिझेल उपलब्ध होत असले, तरी काही तासांतच इंधन संपल्याचा फलक लावण्यात येत असून अनेक वाहनधारकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.

आज दुपारी दोन्ही पेट्रोल पंपांवर पाहणी केली असता वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या. डिझेल व पेट्रोल नेमके कधी येणार, याची ठोस माहिती वाहनधारकांना नसली तरी इंधन मिळावे, या अपेक्षेने अनेक जण तासन्तास प्रतीक्षा करत आहेत.

आज सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पाटील ब्रदर्स पेट्रोल पंपावर डिझेल व पेट्रोलचा टँकर आल्यानंतर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. काही ठिकाणी वाहनांसोबत ड्रम आणि कॅनही लाईनमध्ये ठेवण्यात आल्याचे चित्र दिसून आले. मात्र, पाटील ब्रदर्स तसेच ओंकार पेट्रोल पंप प्रशासनाकडून वाहनाशिवाय इतर ड्रम किंवा कॅनमध्ये इंधन दिले जात नसल्याचे सांगण्यात आले. असे असतानाही परिसरात मोठ्या प्रमाणात कॅन आणि ड्रम दिसून आले.

इंधनटंचाईमुळे शेतीची कामे रखडली

मार्च आणि एप्रिल महिन्यात रब्बी हंगामातील पिकांची काढणी पूर्ण झाली असून, मे महिन्यात खरीपपूर्व मशागतीची कामे वेगाने सुरू आहेत. नांगरणी, वखरपाळी यांसारखी कामे वेळेत होणे आवश्यक असल्याने शेतकरी ट्रॅक्टर चालकांशी संपर्क साधून शेतीची कामे सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, “आधी डिझेल द्या, पैसे नंतर द्या; तरच शेतात येतो,” अशी अट काही ट्रॅक्टर चालकांकडून घातली जात असल्याने पेट्रोल पंपांवरील कॅन व ड्रमची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.

शासनाने केवळ वाहनांमध्येच इंधन देण्याचे आदेश दिल्याने गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल पंपांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागत असून, परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. पुढील काळात पोलिस बंदोबस्तात इंधन वितरण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने अनेक वाहनधारकांची कोंडी होण्याची शक्यता आहे.

 

“पेट्रोल पंपावर काल रात्रीपासून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. इंधनाची आवक कमी असल्याने प्रत्येकाला पेट्रोल व डिझेल मिळेल, या अपेक्षेने मर्यादित स्वरूपात वितरण केले जात आहे.”

— अरविंद बेंदाडे, रविंद्र पाटील, पेट्रोल पंप चालक, साखरखेर्डा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top