Power supply : १३ जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे साखरखेर्डा-शेंदुर्जन ३३ केव्ही वीजवाहिनीचे अनेक खांब कोसळल्याने शेंदुर्जन उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या आठ गावांचा वीजपुरवठा तब्बल ५० तास खंडित राहिला. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर रविवारी दुपारी वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र, या घटनेमुळे महावितरणच्या यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

साखरखेर्डा : १३ जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे साखरखेर्डा-शेंदुर्जन ३३ केव्ही वीजवाहिनीचे अनेक खांब कोसळल्याने शेंदुर्जन उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या आठ गावांचा वीजपुरवठा तब्बल ५० तास खंडित राहिला. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर रविवारी दुपारी वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र, या घटनेमुळे महावितरणच्या यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शेंदुर्जन येथील ३३ केव्ही उपकेंद्रातून गोरेगाव, तांदुळवाडी, उमनगाव, पांग्रीकाटे, बाळसमुद्र, लिंगा, सायाळा आणि राजेगाव या गावांना वीजपुरवठा केला जातो. १३ जून रोजी सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्याने साखरखेर्डा, शेंदुर्जन आणि मलकापूर पांग्रा परिसराला अक्षरशः झोडपून काढले. अनेक झाडे उन्मळून पडली तर शेंदुर्जन-साखरखेर्डा दरम्यानच्या ३३ केव्ही लाईनचे अनेक खांबही कोसळले.
विशेष म्हणजे, या वीजवाहिनीचे काम अवघ्या एका वर्षापूर्वीच पूर्ण झाले होते. त्यामुळे नव्याने उभारण्यात आलेल्या लाईनचे खांब एवढ्या कमी कालावधीत कोसळल्याने कामाच्या गुणवत्तेबाबतही शंका उपस्थित केल्या जात आहेत. स्थानिक नागरिकांकडून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेतातील वीजपंप बंद पडणे, लघुउद्योग व व्यापारी व्यवहारांवर परिणाम अशा अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागले. तरीही संबंधित अधिकाऱ्यांकडून तातडीची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबूराव मोरे यांनी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी हेल्पर, लाईनमन आणि कनिष्ठ अभियंता रोहित पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणत्याही अधिकाऱ्याने प्रतिसाद दिला नसल्याचा आरोप त्यांनी केला. एका कंत्राटी कर्मचाऱ्याने तर “आम्हाला काम सांगण्याचा अधिकार तुम्हाला नाही,” असे उत्तर दिल्याचेही मोरे यांनी सांगितले.
यानंतर बाबूराव मोरे यांनी थेट मुख्य कार्यकारी अभियंता आलेगावकर यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. वरिष्ठ स्तरावरून तातडीने दखल घेण्यात आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम सुरू करून साखरखेर्डा उपकेंद्रातून पर्यायी व्यवस्था करत वीजपुरवठा सुरळीत केला.
दरम्यान, साखरखेर्डा व परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा प्रश्न कायम असून यावर दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. तसेच निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे वारंवार उद्भवणाऱ्या समस्यांची चौकशी करून संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बाबूराव मोरे यांनी केली आहे.
या घटनेनंतर महावितरणच्या आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेची कार्यक्षमता, देखभाल दुरुस्तीची व्यवस्था आणि नवीन कामांच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

