Mahabreaking

[breaking_news]

Auto-rickshaw :ऑटोचालकांनो, मराठी शिका; २५ चालकांना ३० दिवसांचा अल्टिमेटम, बॅच निलंबनाचा इशारा!

Auto-rickshaw :मराठी भाषेत संवाद साधता न येणाऱ्या ऑटो व टॅक्सीचालकांविरुद्ध अकोला प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) कारवाईला सुरुवात केली आहे. २० ऑगस्टपासून अमराठी भाषिक चालकांची मराठी भाषेतील संवादक्षमता तपासण्यासाठी चाचणी घेण्यात येत असून, समाधानकारक उत्तरे न देणाऱ्या चालकांना मराठी शिकण्यासाठी ३० दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.

Auto-rickshaw

  अकोला आरटीओची ‘मराठी’ मोहीम; १०० चालकांची चाचणी, २५ अनुत्तीर्ण

आगाखान पठाण

अकोला : मराठी भाषेत संवाद साधता न येणाऱ्या ऑटो व टॅक्सीचालकांविरुद्ध अकोला प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) कारवाईला सुरुवात केली आहे. २० ऑगस्टपासून अमराठी भाषिक चालकांची मराठी भाषेतील संवादक्षमता तपासण्यासाठी चाचणी घेण्यात येत असून, समाधानकारक उत्तरे न देणाऱ्या चालकांना मराठी शिकण्यासाठी ३० दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. या मुदतीत मराठी न शिकल्यास चालकाचा लायसन्स बॅच तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याची कारवाई केली जाणार आहे. त्यानंतरही नियमांचे पालन न केल्यास लायसन्स बॅच व परवान्याबाबत कायमस्वरूपी निलंबनाची कारवाई होऊ शकते, असे आरटीओकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अकोला आरटीओकडून आतापर्यंत १०० अमराठी भाषिक ऑटोचालकांची मराठी चाचणी घेण्यात आली असून, त्यापैकी २५ चालक अनुत्तीर्ण झाले आहेत. या चालकांना नोटिसा बजावून मराठी शिकण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

चाचणीदरम्यान आरटीओ अधिकारी चालकांशी मराठीत संवाद साधून त्यांना प्रश्न विचारत आहेत. प्रवाशांशी मराठीत संवाद साधता येतो का, सूचना समजतात का आणि दैनंदिन व्यवहारातील आवश्यक माहिती देता येते का, याची तपासणी केली जात आहे. समाधानकारक उत्तर न देणाऱ्या चालकांना नोटीस बजावण्यात येत आहे.

परिवहन आयुक्त तसेच राज्याच्या परिवहन विभागाच्या निर्देशानुसार राज्यभर या मोहिमेची अंमलबजावणी सुरू असल्याचे आरटीओकडून सांगण्यात आले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांविरुद्ध टप्प्याटप्प्याने कारवाई केली जाणार आहे.

अकोला आरटीओचे अधिकारी रविंद्र भुयार आणि सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मोहम्मद समीर ताम्हणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ मोटार वाहन निरीक्षक अनिरुद्ध देवधर, वरिष्ठ मोटार वाहन निरीक्षक संदीप तायडे, किरणकुमार लोणे, राजकुमार मोरमारे, सम्राट शेंडे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विनोद जाधव, ममता इंगोले, चालक अनिल गुंजकर आणि गौतम आरकराव यांच्या पथकाकडून ही मोहीम राबविण्यात येत आहे.

आरटीओने ही मोहीम अधिक तीव्र केली असून, अमराठी भाषिक ऑटो व टॅक्सीचालकांनी दिलेल्या मुदतीत मराठी भाषा शिकून आवश्यक चाचणी उत्तीर्ण व्हावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे पालन न केल्यास बॅच व परवान्याबाबत कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top