Police raid illegal petrol : मेहकर तालुक्यातील अंजनी बु. येथे विनापरवाना बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेल्या पेट्रोलवर डोणगाव पोलिसांनी धडक कारवाई करत २७० लिटर पेट्रोलसह ३४ हजार २६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, अवैध इंधन साठा आणि विक्रीविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

विनापरवाना पेट्रोलचा साठा उघड; डोणगाव पोलिसांची धडक कारवाई, एकावर गुन्हा
डोणगाव : मेहकर तालुक्यातील अंजनी बु. येथे विनापरवाना बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेल्या पेट्रोलवर डोणगाव पोलिसांनी धडक कारवाई करत २७० लिटर पेट्रोलसह ३४ हजार २६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, अवैध इंधन साठा आणि विक्रीविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २६ जुलै २०२६ रोजी डोणगाव पोलिसांना ग्राम अंजनी बु. (ता. मेहकर) येथे एका व्यक्तीने विनापरवाना मोठ्या प्रमाणात पेट्रोलचा साठा करून ठेवला असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे ठाणेदार गणेश इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईदरम्यान आरोपी भागवत रामदास लाड (वय २५, रा. अंजनी बु., ता. मेहकर) याच्या घरातून विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेले २७० लिटर पेट्रोल आणि ८ प्लास्टिकचे कॅन आढळून आले. संबंधिताकडे इंधन साठविण्याचा अथवा विक्रीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईत एकूण ३४ हजार २६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध डोणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३५/२०२६ अन्वये जीवनावश्यक वस्तू अधिनियमाच्या कलम ३ व ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई ठाणेदार गणेश इंगोले यांच्या नेतृत्वाखाली डोणगाव पोलीस पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, बेकायदेशीररीत्या इंधन साठवणूक, वाहतूक अथवा विक्री करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
दरम्यान, ग्रामीण भागात विनापरवाना इंधन साठविल्यामुळे आग किंवा अन्य अपघातांचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा बेकायदेशीर कृत्यांची माहिती नागरिकांनी तातडीने पोलिसांना द्यावी, असे आवाहनही पोलीस प्रशासनाने केले आहे.

