Oil tankers at midnight : देऊळगाव राजा शहर आणि परिसरात खुल्या खाद्यतेलाच्या संशयास्पद विक्रीचा प्रकार पुन्हा डोके वर काढत असल्याची चर्चा असून, अन्न व औषध प्रशासनाच्या कथित निष्क्रियतेमुळे भेसळखोरांचे फावले असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. मध्यरात्रीच्या सुमारास शहरात खाद्यतेलाचे टँकर दाखल होतात आणि त्यानंतर हेच तेल आकर्षक डब्यांमध्ये भरून बाजारात विक्रीसाठी पाठविले जात असल्याची चर्चा रंगली आहे. या प्रकरणाची सत्यता प्रशासनाने तपासावी, अशी मागणी जोर धरत आहे.

भेसळखोर पुन्हा सक्रिय? एफडीएच्या कथित निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
गजानन तिडके
देऊळगाव राजा : देऊळगाव राजा शहर आणि परिसरात खुल्या खाद्यतेलाच्या संशयास्पद विक्रीचा प्रकार पुन्हा डोके वर काढत असल्याची चर्चा असून, अन्न व औषध प्रशासनाच्या कथित निष्क्रियतेमुळे भेसळखोरांचे फावले असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. मध्यरात्रीच्या सुमारास शहरात खाद्यतेलाचे टँकर दाखल होतात आणि त्यानंतर हेच तेल आकर्षक डब्यांमध्ये भरून बाजारात विक्रीसाठी पाठविले जात असल्याची चर्चा रंगली आहे. या प्रकरणाची सत्यता प्रशासनाने तपासावी, अशी मागणी जोर धरत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शहरातील काही व्यावसायिकांकडे टँकरद्वारे मोठ्या प्रमाणात खुले खाद्यतेल येते. त्यानंतर ते विविध डब्यांमध्ये भरून देऊळगाव राजा शहरासह ग्रामीण भागातील किराणा दुकानांमध्ये विक्रीसाठी पुरवले जात असल्याचा आरोप केला जात आहे. या तेलाची गुणवत्ता, स्त्रोत, परवाना आणि प्रयोगशाळेतील तपासणी याबाबत कोणतीही माहिती ग्राहकांना उपलब्ध नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
काही दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाने देऊळगाव मही येथे गुटखा विक्रीविरोधात धडक कारवाई केली होती. मात्र त्यानंतर तालुक्यात खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही मोठी कारवाई झालेली नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुदतबाह्य खाद्यपदार्थ आणि खुल्या खाद्यतेलाच्या विक्रीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
विशेष म्हणजे, शहरात खुले खाद्यतेल डबाबंद करून विक्री केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात असला तरी त्याबाबत अधिकृत तपास किंवा प्रयोगशाळेचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे या चर्चेची वस्तुस्थिती तपासण्याची जबाबदारी आता अन्न व औषध प्रशासनावर असल्याचे मत व्यक्त होत आहे.
आरोग्याचा प्रश्न गंभीर
अन्नपदार्थांमध्ये भेसळ झाल्यास त्याचे गंभीर परिणाम सर्वसामान्यांच्या आरोग्यावर होऊ शकतात. त्यामुळे शहरात येणारे खुले खाद्यतेल नेमके कुठून येते, ते कोणत्या दर्जाचे आहे, त्यात कोणत्याही प्रकारची भेसळ आहे का आणि ते विक्रीसाठी कायदेशीर निकष पूर्ण करते का, याची सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडे मध्यरात्री शहरात येणाऱ्या खाद्यतेलाच्या टँकरची तपासणी करावी, संशयित ठिकाणांवर छापे टाकावेत, तेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत आणि दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
ग्राहक संरक्षण परिषदेची मागणी
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य चंद्रकांत खरात यांनी सांगितले की, “खुले खाद्यतेल तसेच इतर खाद्यपदार्थांमध्ये भेसळीची शक्यता लक्षात घेता अन्न व औषध प्रशासनाने नियमित तपासण्या करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. केवळ खुल्या खाद्यतेलाच नव्हे, तर इतर खाद्यपदार्थांचीदेखील सातत्याने तपासणी होणे गरजेचे आहे.”

