Fit India Campaign :अकोला पोलीस व भारतीय खेळ प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पोलीस अधीक्षक अचिंत चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन उडान’ अंतर्गत ‘फिट इंडिया अभियान २०२६’ अंतर्गत गुरुवारी (दि. ४) पोलीस मुख्यालय, अकोला येथे योग व ध्यान सत्र उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

योग, प्राणायाम व ध्यानातून निरोगी जीवनाचा संदेश; अकोला पोलीस दलाचा अभिनव उपक्रम
अकोला : अकोला पोलीस व भारतीय खेळ प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पोलीस अधीक्षक अचिंत चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन उडान’ अंतर्गत ‘फिट इंडिया अभियान २०२६’ अंतर्गत गुरुवारी (दि. ४) पोलीस मुख्यालय, अकोला येथे योग व ध्यान सत्र उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
सकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या सत्रात पोलीस अधिकारी, कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. योग सत्रासाठी योगगुरू आनंद थत्ते (बी.ए. सायकॉलॉजी, एम.ए. संस्कृत लिटरेचर), सोनल आनंद थत्ते (एम.ए. संस्कृत, सुवर्णपदक विजेत्या) तसेच अर्जुन मनोहर हिंगमिरे (बी.एड., बी.ए. योगा) यांनी उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.
तसेच, ध्यान सत्रासाठी हार्टफुलनेस रिसर्च अँड एज्युकेशन सेंटर, हैदराबाद यांच्या वतीने संजय हेडाऊ, छाया हेडाऊ, आशिष जगनाडे, रेखा चव्हाण आणि भरत पटेल यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी ध्यानाचे महत्त्व, मानसिक आरोग्य संवर्धन आणि तणावमुक्त जीवनशैली याविषयी उपस्थितांना माहिती दिली.उपस्थितांनी या सत्राचा लाभ घेत शारीरिक व मानसिक आरोग्य वृद्धीसाठी नियमित व्यायाम, योग आणि ध्यान यांचे महत्त्व जाणून घेतले.‘फिट इंडिया अभियान २०२६’ अंतर्गत पुढील कार्यक्रमांमध्ये ५ जून रोजी झुंबा फिटनेस, ६ जून रोजी दोरीवरील उड्या (स्किपिंग) आणि ७ जून रोजी ‘संडे ऑन सायकल’ सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
अकोला पोलीस दलातर्फे सर्व नागरिक, विद्यार्थी, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी या आगामी कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन ‘फिट इंडिया, निरोगी भारत’ या अभियानाला बळ द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राखीव पोलीस निरीक्षक गणेश जुमनाके, राखीव पोलीस उपनिरीक्षक गुलाब पाटणकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस हवालदार गोपाल मुकुंदे यांनी केले.

