Operation Prahar : जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध पोलीस प्रशासनाने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने आलेगाव परिसरात धडाकेबाज कारवाई केली. पोलीस स्टेशन चान्नी हद्दीतील आलेगाव परिसरात एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून जुगार अड्डा आणि गावठी हातभट्टी दारू निर्मितीच्या दोन ठिकाणांचा पर्दाफाश करण्यात आला. या तिन्ही कारवायांमध्ये एकूण १ लाख ४४ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला असून, सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

निर्गुणा नदीपात्रात गावठी दारूचा धंदा, मंदिराजवळ जुगार! स्थानिक गुन्हे शाखेचे एकाच दिवशी तिहेरी छापे
अकोला : जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध पोलीस प्रशासनाने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने आलेगाव परिसरात धडाकेबाज कारवाई केली. पोलीस स्टेशन चान्नी हद्दीतील आलेगाव परिसरात एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून जुगार अड्डा आणि गावठी हातभट्टी दारू निर्मितीच्या दोन ठिकाणांचा पर्दाफाश करण्यात आला. या तिन्ही कारवायांमध्ये एकूण १ लाख ४४ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला असून, सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी पोलीस स्टेशन चान्नी हद्दीतील आलेगाव, चरणगाव तसेच परिसरातील गावांमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांना विशेष पथक स्थापन करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. या आदेशानुसार २० नोव्हेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक परिसरात गस्त घालत असताना गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे तीन ठिकाणी छापे टाकण्यात आले.
चक्रधर स्वामी मंदिर परिसरात जुगार अड्ड्यावर छापा
पहिल्या कारवाईत आलेगाव येथील चक्रधर स्वामी मंदिराच्या बाजूला गावठाणातील खुल्या जागेत तीन पानी परेल नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकून किरण भाऊराव तेलगोटे, अनंत प्रल्हाद गिरे आणि देवनाथ सूर्यभान तेलगोटे (तिघेही रा. आलेगाव, ता. पातूर) यांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून ५२ तासपत्ते, रोख २ हजार ४०० रुपये आणि मोबाईल असा एकूण १३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
निर्गुणा नदीपात्रात हातभट्टी दारू निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त
दुसऱ्या कारवाईत आलेगाव शेतशिवारातील निर्गुणा नदीपात्रात अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू गाळली जात असल्याचे समोर आले. या ठिकाणी छापा टाकून निसार खाँ जावेद खाँ (वय ३३, रा. मोमीनपुरा, आलेगाव) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून २० लिटर गावठी हातभट्टीची दारू आणि ३७७ लिटर सडवा मोहमाच असा एकूण ६० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दारूचे नमुने घेण्यात आल्यानंतर उर्वरित मुद्देमाल घटनास्थळीच नष्ट करण्यात आला.
डुक्करधरा नाल्यावरही कारवाई
तिसऱ्या कारवाईत आलेगाव शिवारातील डुक्करधरा नाला परिसरात, निर्गुणा नदीच्या बाजूला हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी येथे छापा टाकून रघुनाथ जालंदरनाथ सातपुते आणि विजय राजाराम सोनोणे यांना ताब्यात घेतले. या ठिकाणाहून १५ लिटर गावठी हातभट्टीची दारू आणि ४५० लिटर सडवा मोहमाच असा एकूण ७० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. हा मुद्देमालही जागीच नष्ट करण्यात आला.
सहा आरोपींविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल
या तिन्ही कारवायांमध्ये एकूण १ लाख ४४ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त व नष्ट करण्यात आला. याप्रकरणी सहा आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन चान्नी येथे महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२ (अ) तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई), (फ) व (ड) अन्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कारवाई
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल जाधव, पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, पोलीस अंमलदार शेख हसन, रविंद्र खंडारे, अमित दुबे, श्रीकांत पातोंड, पवन डंबलकर तसेच वाहनचालक प्रकाश लोखंडे यांचा समावेश होता.
आलेगाव परिसरात एकाच दिवशी करण्यात आलेल्या या तिहेरी कारवाईमुळे अवैध जुगार आणि गावठी हातभट्टी दारू निर्मिती करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत पोलिसांची कारवाई सुरूच राहणार असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

