Horrific accident : डोणगाव-मालेगाव मार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना २० नोव्हेंबर रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. डोणगावपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या माता अनुसया वेअर हाऊसजवळ हा भीषण अपघात झाला. अपघातात मृत व्यक्तीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आल्याने त्याची ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे.

माता अनुसया वेअर हाऊसजवळ मृत्यूचा थरार; मृतदेह छिन्नविछिन्न, ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान
डोणगाव : डोणगाव-मालेगाव मार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना २० नोव्हेंबर रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. डोणगावपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या माता अनुसया वेअर हाऊसजवळ हा भीषण अपघात झाला. अपघातात मृत व्यक्तीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आल्याने त्याची ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे.
प्राप्त माहितीनुसार, २० नोव्हेंबर रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास डोणगाव-मालेगाव मार्गावरील माता अनुसया वेअर हाऊसजवळ एका अनोळखी व्यक्तीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला. धडक इतकी भीषण होती की मृतदेहाची अवस्था छिन्नविछिन्न झाली होती. त्यामुळे मृत व्यक्तीची ओळख पटविणे कठीण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच डोणगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विजय अजमिरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेहकर येथे पाठविला.
दरम्यान, अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला असून, अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाचीही ओळख पटलेली नाही. वृत्त लिहिपर्यंत मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले नव्हते.
त्याच परिसरात दुचाकीस्वार जखमी असल्याची चर्चा
दरम्यान, अपघातस्थळाच्या परिसरातील पुलाखाली पल्सर दुचाकी आढळून आल्याची माहिती आहे. या दुचाकीवरील चालक जखमी झाल्याची चर्चा असून, तो रिसोड तालुक्यातील लेहणी येथील एकाची असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या माहितीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या घटनेचा आणि मुख्य अपघाताचा परस्पर संबंध आहे किंवा नाही, हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू असून, मृत व्यक्तीची ओळख आणि अपघातास कारणीभूत वाहनाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

