Online System Down :गत काही दिवसांपासून चार ते पाच दिवसांपासून ‘महाऑनलाईन’ (सेतू) पोर्टल ठप्प असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांचे नॉन-क्रीमी लेयर व जात प्रमाणपत्र प्रलंबित राहिले होते. या परिस्थितीत उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी पुढाकार घेत ऑफलाईन पद्धतीने प्रमाणपत्रांचे वितरण करून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला.

महाराष्ट्र दिनी विद्यार्थ्यांना दिलासा; शैक्षणिक नुकसान टळले
गजानन तिडके
देऊळगाव राजा : गत काही दिवसांपासून चार ते पाच दिवसांपासून ‘महाऑनलाईन’ (सेतू) पोर्टल ठप्प असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांचे नॉन-क्रीमी लेयर व जात प्रमाणपत्र प्रलंबित राहिले होते. या परिस्थितीत उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी पुढाकार घेत ऑफलाईन पद्धतीने प्रमाणपत्रांचे वितरण करून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला.
सेतू केंद्रावरील ऑनलाईन सेवा पूर्णपणे बंद असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले अडकले होते. यामुळे प्रवेश प्रक्रियेत अडथळे निर्माण होण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी खडसे यांनी तातडीने पर्यायी व्यवस्था करत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑफलाईन प्रमाणपत्रे निर्गमित करण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना वेळेत आवश्यक कागदपत्रे मिळाली असून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. पालकांकडूनही या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.प्रा.संजय खडसे यांनी यापूर्वीही विद्यार्थ्यांसह वयोवृद्ध नागरिकांच्या प्रश्नांवर तत्परतेने कार्य करत प्रशासनात संवेदनशीलता जपल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना नुकताच जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
ऑनलाईन युगात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानंतरही प्रशासनाने मानवी दृष्टिकोन ठेवत तत्काळ निर्णय घेतल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले असून या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

