Guardian Minister : पावसातील खंड, अनियमित पर्जन्यमान आणि त्याचा पिकांच्या वाढीवर झालेला परिणाम यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या आणि पिकांची वस्तुस्थिती प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी थेट शेताच्या बांधावर पोहोचून पिकांची पाहणी केली. नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी अचूक पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून बाधित शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्र्यांचा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर दौरा
गजानन तिडके
बुलढाणा : पावसातील खंड, अनियमित पर्जन्यमान आणि त्याचा पिकांच्या वाढीवर झालेला परिणाम यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या आणि पिकांची वस्तुस्थिती प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी थेट शेताच्या बांधावर पोहोचून पिकांची पाहणी केली. नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी अचूक पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून बाधित शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी चिखली तालुक्यातील केळवद, मौजे मालगणी, बेराळा, वसंतनगर व सरंबा, तसेच सिंदखेडराजा तालुक्यातील सावरगाव माळ या गावांना भेट देऊन शेताच्या बांधावर जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत पावसातील खंड, पिकांची सद्यस्थिती, उत्पादनावर होणारा संभाव्य परिणाम तसेच शेतीसमोरील विविध अडचणींची माहिती घेतली.
शेतकऱ्यांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ आढावा
जिल्ह्यातील पीक परिस्थिती आणि नुकसानीचा प्रशासकीय यंत्रणेकडून आढावा घेण्यात आला आहे. त्याआधारे शासनस्तरावर लवकरच मदतीबाबत निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले.
नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे अचूक, वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. प्रत्यक्ष नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नोंद घेऊन कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उपलब्ध पाणीसाठ्याचा शेतीसाठी योग्य पद्धतीने उपयोग करता यावा, यासाठी सिंचनाचे नियोजन करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

खडकपूर्णा धरणाचीही पाहणी
पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दौऱ्यादरम्यान सिंदखेडराजा तालुक्यातील खडकपूर्णा धरणाची पाहणी केली. धरणातील सद्य पाणीपातळी, उपलब्ध पाणीसाठा तसेच सिंचनासाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्याची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.
पिण्याच्या पाण्याचे आवश्यक आरक्षण कायम ठेवून उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी योग्य वापर करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. त्यासाठी आवश्यक आराखडा तयार करून पाण्याचे व्यवस्थापन करावे, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
आमदारांसह अधिकारी व शेतकऱ्यांची उपस्थिती
पालकमंत्र्यांच्या या पाहणी दौऱ्यात आमदार श्वेता महाले, आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, तहसीलदार विजय सवळे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधल्याने नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्रशासनाच्या पातळीवर तातडीने गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

