Mahabreaking

[breaking_news]

Guardian Minister Makarand Patil: कर्जमाफीच्या लाभार्थी शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज द्या; पालकमंत्री मकरंद पाटील यांचे बँकांना निर्देश

Guardian Minister Makarand Patil: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामासाठी तातडीने नवीन पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, तसेच कर्जप्रकरणांचा जागेवरच निपटारा करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विशेष पीक कर्ज शिबिरांचे आयोजन करावे, असे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी दिले.

Makarand Patil

  शेतकरी कर्जप्रश्नावर पालकमंत्र्यांची धडक भूमिका; २८२ बँक शाखांना ९७० कोटींचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट

गजानन तिडके

बुलढाणा : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामासाठी तातडीने नवीन पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, तसेच कर्जप्रकरणांचा जागेवरच निपटारा करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विशेष पीक कर्ज शिबिरांचे आयोजन करावे, असे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी दिले.

Makarand Patil

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी वेळेत आर्थिक पतपुरवठा मिळावा, या उद्देशाने पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासन आणि बँकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. अनियमित पर्जन्यमानामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री ना. मकरंद पाटील दि. २४ सप्टेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या सूचना दिल्या.

यावेळी आमदार श्वेता महाले, आमदार मनोज कायंदे, आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, लीड बँकेचे कौशद्रसिंह कुमार, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, तहसीलदार विजय सवळे, ॲड. नाझेर काझी यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.

Makarand Patil

आमदार मनोज कायंदेंच्या मागणीची तत्काळ कार्यवाही,प्रत्येक तालुक्यात विशेष पीक कर्ज शिबीर

शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामासाठी नवीन पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आमदार मनोज कायंदे, संजय गायकवाड आणि श्वेता महाले यांनी पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विशेष पीक कर्ज शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आमदारांच्या मागणीला पालकमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे.

पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत, ग्रामीण तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी तालुकास्तरावर विशेष पीक कर्ज शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना दिल्या. या शिबिरांमध्ये पात्र शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेणे आणि कर्जप्रकरणांवर आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करून पीक कर्जाचे वितरण सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले.

‘त्याच बँकेने द्यावे नवीन पीक कर्ज’

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ ज्या बँकेच्या शाखेमार्फत संबंधित शेतकऱ्याला मिळाला आहे, त्याच बँकेने चालू खरीप हंगामासाठी पात्र शेतकऱ्याला नवीन पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दिले.

नवीन पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना इतर बँकांच्या शाखांमध्ये विनाकारण हेलपाटे मारावे लागू नयेत, याची दक्षता संबंधित शाखा व्यवस्थापकांनी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेतीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक वित्तपुरवठा वेळेत मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या कर्जप्रकरणांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई अथवा टाळाटाळ होऊ नये. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून विहित प्रक्रियेनुसार कर्जमंजुरी व वितरणाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देशही देण्यात आले.

२८२ बँक शाखांना ९७० कोटींचे उद्दिष्ट

जिल्ह्यातील २८२ बँक शाखांना १ लाख १६ हजार खात्यांसाठी ९७० कोटी रुपयांचे खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत ६ हजार ५०० खात्यांना ७८ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्यात आले आहे. विशेषतः खासगी बँकांनी पीक कर्ज वितरणाचा वेग वाढवून पात्र शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

दरम्यान, पात्र शेतकऱ्यांनी तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष पीक कर्ज शिबिरांचा लाभ घ्यावा. आवश्यक कागदपत्रांसह कर्जप्रकरणे सादर करून खरीप हंगामासाठी उपलब्ध पीक कर्ज सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top