Mahabreaking

[breaking_news]

Sushil Telgote Case :निळा जनउठावचा अकोल्यात एल्गार; सुशील तेलगोटे प्रकरणी न्यायासाठी जनआक्रोश

Sushil Telgote Case : शहीद सुशील तेलगोटे यांची हत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी अकोल्यात ‘निळा जनउठाव’ जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या नेतृत्वात निघालेला हा मोर्चा प्रचंड उष्णतेत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

Sushil Telgote Case

४५ अंश तापमानातही न्यायासाठी लढा; अकोल्यात जनआक्रोश मोर्चाची धडक

 संजय तायडे

अकोला : शहीद सुशील तेलगोटे यांची हत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी अकोल्यात ‘निळा जनउठाव’ जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या नेतृत्वात निघालेला हा मोर्चा प्रचंड उष्णतेत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

सुमारे ४५ अंश तापमानातही मोठ्या संख्येने नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. पीडित कुटुंबीयांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र हातात घेऊन न्यायासाठी घोषणाबाजी केली. संपूर्ण वातावरण संतप्त झाले होते.

मोर्चादरम्यान दीपक केदार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “देशासाठी लढणाऱ्या सैनिकाची निर्घृण हत्या होऊनही सरकार संवेदनशीलतेने दखल घेत नाही. गृहमंत्र्यांनी पीडित कुटुंबीयांशी संपर्क साधलेला नाही, तसेच अंत्यविधीलाही कोणताही लोकप्रतिनिधी उपस्थित राहिला नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे,” असे त्यांनी म्हटले.

मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. “एवढ्या तीव्र उन्हात सैनिकाचे कुटुंब न्यायासाठी रस्त्यावर उतरले आहे, तरीही प्रशासन दुर्लक्ष करत आहे,” असा आरोपही करण्यात आला.

या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागण्या करण्यात आल्या. त्यामध्ये फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा देणे, विशेष तपास पथक (SIT)मार्फत सखोल चौकशी करणे, पीडित कुटुंबाला १ कोटी रुपयांची आर्थिक मदत व शासकीय नोकरी देणे, तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणे यांचा समावेश आहे.

मोर्चात जिल्हाध्यक्ष परवेज खान, बौद्ध संघर्ष समितीचे जीवन डिगे, युवा विदर्भ अध्यक्ष संकेत जाधव, आयोजक मनोज इंगळे, टिल्लू गवई, नागेश खरात, दिलीप वानखेडे, आसिफ शेख, दीपक गोपनारायण, भुर्या डोंगरे, आरिफ शाह, रफिक शाह, प्रफुल्ल वाघ, राष्ट्रपाल तेलगोटे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

दरम्यान, न्याय न मिळाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करत थेट मंत्रालयावर धडक देण्याचा गर्भित इशारा दीपक केदार यांनी दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top