New momentum :स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला निर्णायक टप्प्यावर नेण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने ‘मिशन २०२७’ची घोषणा केली असून, डिसेंबर २०२७ पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करूनच राहणार, असा ठाम निर्धार समितीचे मुख्य अध्यक्ष तथा माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी व्यक्त केला. सिंदखेडराजा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मिशन २०२७”चा बिगुल; डिसेंबर २०२७ पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्याचा निर्धार – अॅड. वामनराव चटप
सिंदखेडराजा: स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला निर्णायक टप्प्यावर नेण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने ‘मिशन २०२७’ची घोषणा केली असून, डिसेंबर २०२७ पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करूनच राहणार, असा ठाम निर्धार समितीचे मुख्य अध्यक्ष तथा माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी व्यक्त केला. सिंदखेडराजा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विदर्भातील ११ जिल्हे आणि १२० तालुक्यांमधील प्रत्येक गावापर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्याची चळवळ पोहोचविण्यासाठी २५ जुलै २०२६ रोजी राष्ट्रमाता जिजाऊंचे माहेर असलेल्या ऐतिहासिक सिंदखेडराजा नगरीत ‘विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा’ आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
या मेळाव्याच्या नियोजनासाठी ६ जून रोजी झालेल्या बैठकीत कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यात आली. यापूर्वी २० मे २०२६ रोजी नागपूर येथे झालेल्या कोअर कमिटी, जिल्हाप्रमुख व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ‘मिशन २०२७’ची घोषणा करण्यात आली होती. त्याच मोहिमेचा भाग म्हणून विदर्भभर जनसंकल्प मेळावे आयोजित केले जात आहेत.
अॅड. चटप यांनी विदर्भातील सिंचन अनुशेष, अपूर्ण सिंचन प्रकल्प आणि शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारवर टीका केली. नागपूर करारानुसार सिंचन क्षेत्रातील अनुशेष भरून काढणे, प्रलंबित प्रकल्प पूर्ण करणे आणि मोठ्या प्रमाणावर जमीन ओलिताखाली आणणे अपेक्षित होते. मात्र आजही विदर्भातील शेतकरी संकटातून बाहेर पडलेले नसल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी समितीने महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीबाबतही चिंता व्यक्त केली. वाढती महसुली व राजकोषीय तूट, प्रचंड कर्जबाजारीपणा, कंत्राटदारांची थकबाकी आणि शेतकरी कर्जमाफीची रक्कम यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती गंभीर बनल्याचा दावा करण्यात आला.
कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरही समितीने सरकारवर निशाणा साधला. राज्यात गुन्हेगारी वाढत असून सरकार कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरत असल्याची टीका यावेळी करण्यात आली.
“महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरही विदर्भाच्या वाट्याला विकासातील अनुशेष, शेतकरी आत्महत्या आणि प्रशासकीय दुर्लक्ष आले आहे. या सर्व समस्यांवर कायमस्वरूपी उपाय म्हणजे स्वतंत्र विदर्भ राज्य,” असा पुनरुच्चार अॅड. चटप यांनी केला.
पत्रकार परिषदेला युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मासुरकर, माजी सभापती शिवाजीराजे जाधव, अॅड. रामेश्वर मेहेत्रे, प्रा. डॉ. पी. आर. राजपूत, अॅड. सुरेशराव वानखेडे, संभाजी शिर्के, मेधा कोटक, दामोदर शर्मा, डॉ. वंदनाताई काकडे, तेजराव मुंडे, डॉ. पद्माताई राजपूत यांच्यासह समितीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
२५ जुलै रोजी होणाऱ्या ‘विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळाव्या’स विदर्भातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले.

