Sunday On Cycle केंद्र सरकारच्या ‘फिट इंडिया’ अभियानाला चालना देण्यासाठी तसेच जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने रविवारी ‘Sunday On Cycle’ कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर झालेल्या या उपक्रमाला पोलीस अधिकारी, कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, नागरिक तसेच विविध सायकल क्लबच्या सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

फिट इंडिया संकल्पनेला बळ; प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांची विशेष उपस्थिती
बुलढाणा : केंद्र सरकारच्या ‘फिट इंडिया’ अभियानाला चालना देण्यासाठी तसेच जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने रविवारी ‘Sunday On Cycle’ कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर झालेल्या या उपक्रमाला पोलीस अधिकारी, कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, नागरिक तसेच विविध सायकल क्लबच्या सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पंतप्रधानांनी सुरू केलेल्या ‘फिट इंडिया’ संकल्पनेच्या अनुषंगाने तसेच भारतीय खेल प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या निर्देशानुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे नेतृत्व जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले. यावेळी एस. डी. जगमलानी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, बुलढाणा तसेच अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नियमित सायकलिंगचे आरोग्यदायी फायदे अधोरेखित केले. सायकल हा सर्वांगिण व्यायामाचा प्रभावी प्रकार असून त्याद्वारे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य आणि पर्यावरण संवर्धनाला चालना मिळते, असे त्यांनी सांगितले. यानंतर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी आणि अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या हस्ते सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. विशेष म्हणजे या मान्यवरांनी स्वतःही रॅलीत सहभाग घेतला. ही रॅली पोलीस मुख्यालयातून सुरू होऊन कारंजा चौक, त्रिशरण चौक, सुंदरखेड स्टेट बँक मार्गे पुन्हा पोलीस मुख्यालयात परतली.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी उपस्थित पोलीस अधिकारी, कर्मचारी, त्यांचे नातेवाईक, नागरिक आणि सायकलप्रेमींना मार्गदर्शन करत नियमित व्यायाम व आरोग्यदायी जीवनशैलीचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, प्र. पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) बाळकृष्ण पावरा, पोलीस निरीक्षक संग्राम पाटील, गजानन कांबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी आशिष रोही, राखीव पोलीस निरीक्षक विकास तिडके यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सफौ. नसीम मिर्झा, पोहेकॉ. दत्ता पवार, सतीश हातळकर, विजय पैठणे आणि अनंता फरतळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोहेकॉ. निलेश रत्नपारखी यांनी केले, तर आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांनी केले.

