Municipal Council Administration : शहरात गेल्या काही दिवसांपासून दूषित व दुर्गंधीयुक्त पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी २९ मेपासून प्रस्तावित करण्यात आलेल्या बेमुदत आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर नगर परिषद प्रशासन सक्रिय झाले असून, जलसमस्येच्या निवारणासाठी सुरू करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देत आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दूषित पिण्याच्या पाण्यावर सात उपाययोजना; नागरिकांमध्ये संताप, प्रशासनाकडून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन
जाकीर अहमद
बाळापूर : शहरात गेल्या काही दिवसांपासून दूषित व दुर्गंधीयुक्त पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी २९ मेपासून प्रस्तावित करण्यात आलेल्या बेमुदत आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर नगर परिषद प्रशासन सक्रिय झाले असून, जलसमस्येच्या निवारणासाठी सुरू करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देत आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नळाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या पाण्यातून तीव्र दुर्गंधी येत असून त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे आधीच पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांना दूषित पाण्याच्या समस्येलाही सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
नगर परिषद प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना पाठविलेल्या अधिकृत पत्रात शहरवासीयांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार खालील उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
जुन्या फिल्टर प्लेट्सची दुरुस्ती, कच्च्या पाण्याची नियमित तपासणी, शहरातील विविध भागांतून पाण्याचे नमुने संकलित करून प्रयोगशाळा चाचणी, गळती असलेल्या जलवाहिन्या व नाल्यांची दुरुस्ती, पाणीगळती रोखण्यासाठी संरक्षक भिंतींची दुरुस्ती, बेकायदेशीर व दोषपूर्ण नळजोडण्यांविरोधात विशेष मोहीम, जलपुरवठा व्यवस्थेतील तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहे.
प्रशासनाने हेही मान्य केले आहे की, शहरातील विद्यमान जलपुरवठा योजना जुनी व कालबाह्य झाली असून वाढत्या लोकसंख्येचा विचार करून नवीन धरणावर आधारित जलपुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. ही योजना शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे, नागरिकांनी मात्र अनेक वर्षांपासून पाणीप्रश्न सोडविण्याची आश्वासने दिली जात असली तरी अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याची नाराजी व्यक्त केली आहे. दूषित पाण्यामुळे विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त होत आहे.
नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन करत, जलपुरवठ्याबाबत कोणतीही तक्रार असल्यास तत्काळ नगर परिषद प्रशासनाशी संपर्क साधण्याचे सांगितले आहे. प्राप्त प्रत्येक तक्रारीवर तातडीने कार्यवाही केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, प्रशासनाने जाहीर केलेल्या उपाययोजना आणि आश्वासनांकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले असून परिस्थितीत लवकर सुधारणा न झाल्यास प्रस्तावित आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बाळापूरमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा आता सामाजिक आणि स्थानिक राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत असल्याचे चित्र आहे.

