Mother dies while saving her son :तालुक्यातील समशेरपूर येथे अधिक मासानिमित्त धार्मिक स्नानासाठी गेलेल्या माय-लेकाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी पहाटे घडली. मुलाचा जीव वाचवण्यासाठी आईने नदीत उडी घेतली; मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने काळाने दोघांवरही झडप घातली. या घटनेमुळे समशेरपूरसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. वृषाली हरिदास खोत (वय ३५) आणि त्यांचा मुलगा स्वराज हरिदास खोत (वय १०) अशी मृतकांची नावे आहेत.

समशेरपूरमध्ये हृदयद्रावक घटना; दोन महिलांना वाचविण्यात यश
मूर्तिजापूर : तालुक्यातील समशेरपूर येथे अधिक मासानिमित्त धार्मिक स्नानासाठी गेलेल्या माय-लेकाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी पहाटे घडली. मुलाचा जीव वाचवण्यासाठी आईने नदीत उडी घेतली; मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने काळाने दोघांवरही झडप घातली. या घटनेमुळे समशेरपूरसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. वृषाली हरिदास खोत (वय ३५) आणि त्यांचा मुलगा स्वराज हरिदास खोत (वय १०) अशी मृतकांची नावे आहेत.
अधिक मासानिमित्त धार्मिक स्नानासाठी गावातील काही महिला आणि स्वराज नदीवर गेले होते. स्नान सुरू असताना स्वराजला पाण्याचा अंदाज न आल्याने तो अचानक खोल पाण्यात गेला आणि बुडू लागला. मुलगा संकटात असल्याचे लक्षात येताच आई वृषाली खोत यांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला वाचवण्यासाठी नदीत उडी घेतली. मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने ते पाण्याच्या प्रवाहात अडकले आणि मदतीसाठी आर्त हाका मारू लागले.ही घटना पाहून त्यांच्यासोबत असलेल्या माधुरी खोत आणि मीरा चौधरी यांनीही धाडस दाखवत नदीत उडी घेतली. मात्र त्याही पाण्याच्या प्रवाहात अडकल्या. नदीकाठी उपस्थित असलेल्या काही युवकांनी प्रसंगावधान राखत तातडीने पाण्यात उड्या घेतल्या आणि मोठ्या प्रयत्नांनंतर माधुरी खोत व मीरा चौधरी यांना सुखरूप बाहेर काढले.दरम्यान, वृषाली खोत आणि स्वराज खोत यांचा शोध सुरू करण्यात आला. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाच्या मदतीने शोधमोहीम राबविण्यात आली. काही वेळानंतर दोघांचेही मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. या घटनेत बचावलेल्या दोन महिलांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
अधिक मासानिमित्त धार्मिक श्रद्धेपोटी स्नानासाठी गेलेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता नदीत झेपावलेल्या आईचा आणि मुलाचा एकाच वेळी झालेला मृत्यू प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारा ठरला आहे.
समशेरपूरमधील या दुर्दैवी घटनेनंतर नदीकाठावरील सुरक्षाव्यवस्था, खोल पाण्याच्या ठिकाणी इशारा फलक आणि धार्मिक स्नानादरम्यान आवश्यक खबरदारी याविषयी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, माय-लेकाच्या अकाली निधनाने संपूर्ण गाव शोकमग्न झाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

