Shepherd father killed his son : मेंढपाळ बापाने आपल्या आठ वर्षाच्या एकुलत्या एक मुलाचा गुप्तीने वार करून खून केला. त्यानंतर स्वत:वरही वार केल्याची धक्कादायक घटना बार्शीटाकळी तालुक्यातील मिर्झापूर मांगुळ शेत शिवारात ३ मे रोजी दुपारी घडली. जखमी आरोपी बापावर उपचार सुरू आहेत. प्रेम दिलीप मोटे असे मृतक मुलाचे नाव आहे तर दिलीप लहानु मोटे रा. नांद्री ता. खामगाव ,जि. बुलढाणा असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी बार्शिटाकळी पोलिसांनी आरोपी पित्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

पती-पत्नीच्या वादात चिमुकल्याचा बळी; आरोपी पित्याविरुध्द गुन्हा दाखल,मेंढपाळ कुटुंब बुलढाणा जिल्ह्यातील
बबन इंगळे
बार्शीटाकळी : मेंढपाळ बापाने आपल्या आठ वर्षाच्या एकुलत्या एक मुलाचा गुप्तीने वार करून खून केला. त्यानंतर स्वत:वरही वार केल्याची धक्कादायक घटना बार्शीटाकळी तालुक्यातील मिर्झापूर मांगुळ शेत शिवारात ३ मे रोजी दुपारी घडली. जखमी आरोपी बापावर उपचार सुरू आहेत. प्रेम दिलीप मोटे असे मृतक मुलाचे नाव आहे तर दिलीप लहानु मोटे रा. नांद्री ता. खामगाव ,जि. बुलढाणा असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी बार्शिटाकळी पोलिसांनी आरोपी पित्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील नांद्री येथील मेंढपाळ कुटुंब काही दिवसापूर्वीच बार्शी टाकळी तालुक्यात दाखल झाले होते. आरोपी हा पत्नीच्या चारित्रावर नेहमी संशय घेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे .या वादाच्या रागात निरागस निष्पाप असलेल्या व उन्हातान्हात आपल्या आई वडिलांना मेंढ्या चारण्यासाठी घाम गाळून मदत करणाऱ्या एकुलत्या एक प्रेमला धारदार शस्त्राने मारून कायमचे संपविले. ही घटना काळजाला भेदणारी असून आरोपी विषयी संताप जनक आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या आदेशाने मूर्तिजापूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे , बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण धुमाळ,पीएसआय निलेश चाटे आपल्या पोलीस ताफ्यासह दाखल होऊन पंचनामा करण्यात आला व मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. घटनास्थळी मोबाईल फॉरेन्सिक पथकाला सुद्धा पाचारण करण्यात आले होते. या घटनेमुळे समाजमन हळहळले असून एकुलता एक प्रेमचा नाहक बळी गेल्याने आई आपल्या मुलाला पोरकी झाली आहे.या प्रकरणी रात्री उशिरा आरोपी पित्यावर बार्शीटाकळी पोलीस स्टेशन मध्ये कुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास ठाणेदार प्रवीण धुमाळ करीत आहेत.

