Buddhabhumi Shirla : बुद्ध पौर्णिमेच्या पावन निमित्ताने पातूर तालुक्यातील शिर्ला येथील बुद्धभूमी परिवेण बुद्धविहारात विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात पार पडले. विश्वशांती, मानवकल्याण आणि सर्व प्राणिमात्रांच्या मंगलासाठी आयोजित महापरित्राण प्रार्थनेला जिल्हाभरातून बौद्ध अनुयायांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

पातूर : बुद्ध पौर्णिमेच्या पावन निमित्ताने पातूर तालुक्यातील शिर्ला येथील बुद्धभूमी परिवेण बुद्धविहारात विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात पार पडले. विश्वशांती, मानवकल्याण आणि सर्व प्राणिमात्रांच्या मंगलासाठी आयोजित महापरित्राण प्रार्थनेला जिल्हाभरातून बौद्ध अनुयायांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
श्रमण चॅरिटेबल ट्रस्ट, बुद्धभूमी शिर्ला यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ३० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ६ वाजेपर्यंत बारा तास अखंड महापरित्राण प्रार्थना करण्यात आली. या प्रार्थनेदरम्यान बोधिवृक्षाची महापूजा करण्यात आली.
या कार्यक्रमाला भिक्षु संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भदंत बि. संघापालजी महाथेरो यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सोबत पूज्य भदंत श्रद्धपालजी तसेच श्रामनेर संघाने शिस्तबद्ध पद्धतीने प्रार्थना व धार्मिक विधी पार पाडले.
१ मे रोजी सकाळी बुद्ध पौर्णिमेनिमित्त भिक्षु संघाच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पवित्र धातूचे पूजन करण्यात आले. बुद्धांच्या अस्थी उपासकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्याने वातावरण भक्तिमय झाले होते. जिल्ह्यातील तसेच बाहेरील भागातून आलेल्या उपासक-उपासिकांनी या पवित्र दर्शनाचा लाभ घेतला.यानंतर भदंत संघापालजी महाथेरो आणि भदंत श्रद्धपालजी यांनी उपस्थितांना धम्मदेसना देत शांतता, करुणा आणि समतेचा संदेश दिला. सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी मंगल कामना व्यक्त करत त्यांनी उपस्थितांना आशीर्वाद दिले. या कार्यक्रमादरम्यान भिक्षु संघाची चारीकाही पार पडली. संपूर्ण परिसर ‘बुद्ध शरणं गच्छामी’च्या घोषणांनी दुमदुमला होता. श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिकतेचा संगम अनुभवायला मिळाला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बुद्धभूमी मित्रपरिवार, विपश्यना साधना केंद्र तसेच स्थानिक उपासकांनी परिश्रम घेतले. या सोहळ्यामुळे शिर्ला परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून, बुद्धांच्या शांततेच्या संदेशाची पुनश्च आठवण करून देण्यात आली.

