farmer commits suicide :वाढत्या कर्जाला कंटाळून ३५वर्षीय युवा शेतकऱ्याने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार, दि. १ मे रोजी दुपारी पातुर तालुक्यातीन राहेर येथे घडली. राजेश विठ्ठल काळे (वय ३५, रा. राहेर) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

राहेर येथील घटना; परिसरात हळहळ, चान्नी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
राहुल सोनोने
दिग्रस बू : वाढत्या कर्जाला कंटाळून ३५वर्षीय युवा शेतकऱ्याने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार, दि. १ मे रोजी दुपारी पातुर तालुक्यातीन राहेर येथे घडली. राजेश विठ्ठल काळे (वय ३५, रा. राहेर) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
सततची नापिकी, अतिवृष्टी आणि पिकांना पाणी योग्य प्रमाणात न मिळाल्याने शेतीत तोटा होत होता. त्यातच बँकेचे कर्ज असल्यामुळे राजेश काळे हे अनेक दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते. एकीकडे आसमानी संकट, तर दुसरीकडे शासनाच्या उदासीन धोरणांमुळे निर्माण झालेल्या सुलतानी संकटाचा सामना करताना अखेर त्यांनी टोकाचा निर्णय घेतला. शेतात काम करत असताना गावालगत सत्यफुलाबाई पाचपोर यांच्या शेतातील विहिरीत त्यांनी उडी घेऊन आत्महत्या केली. त्या वेळी शेतात त्यांच्या सोबत एक लहान मुलगी होती. त्यांनी विहिरीत उडी घेतल्याचे पाहून त्या मुलीने आरडाओरडा केला आणि तात्काळ घरी धाव घेत कुटुंबीयांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यावर विहिरीतील पाण्यावर मृतदेह तरंगताना दिसून आला. शेतीतील सततचे नुकसान, खर्च न निघणे आणि हमीभावाचा अभाव यामुळे भविष्यातील खर्च पेलणे अशक्य असल्याची खंत ते वारंवार व्यक्त करत होते. याच चिंतेतून त्यांनी हा कठोर निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रविंद्र लांडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह विहिरीतून बाहेर काढून अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी चान्नी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. राजेश काळे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, आई-वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे. या घटनेमुळे राहेर परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, मृताच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

