Marathi conversation lessons:महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागामार्फत अमराठी भाषिक वाहनचालकांना मराठी भाषा अवगत करून देण्यासाठी १ जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या “महाराष्ट्र माझा – मराठी माझी संवाद भाषा” उपक्रमांतर्गत अकोला येथे अमराठी रिक्षाचालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली.

मराठी संवाद कौशल्य वृद्धीसाठी अकोल्यात विशेष प्रशिक्षण; रिक्षाचालकांचा उत्साही सहभाग
आगाखान पठाण
अकोला : महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागामार्फत अमराठी भाषिक वाहनचालकांना मराठी भाषा अवगत करून देण्यासाठी १ जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या “महाराष्ट्र माझा – मराठी माझी संवाद भाषा” उपक्रमांतर्गत अकोला येथे अमराठी रिक्षाचालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली.

महाराष्ट्र शासनाचा परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेत दैनंदिन व्यवहारात उपयुक्त ठरणारी मराठी संवाद कौशल्ये विकसित करण्यावर विशेष भर देण्यात आला.
या निमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सचिव डॉ. दीपा ठाणेकर आणि ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अनुपमा उजगरे यांनी १६ जुलै रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय, अकोला येथे भेट दिली. त्यांच्या आगमनावेळी अकोला आरटीओ कार्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
हा प्रशिक्षण कार्यक्रम प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बुलढाणा पवन नव्हाडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, खामगाव युवराज पाटील, तसेच सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मोहम्मद समीर मोहम्मद शेख आणि संग्राम जगताप उपस्थित होते.
कार्यक्रमाला मोटार वाहन निरीक्षक अनिरुद्ध देवधर, संदीप तायडे, त्रिवेणी घोलप, किरणकुमार लोणे, मोरमारे, रोशन आचरेकर, सम्राट शेंडे, अक्षय, गौरव तेलरांधे, सुरेश शिंदे, मनोज शेळके तसेच सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मनीषा पांचाळ, चैताली राऊत, विनोद जाधव आणि प्रसन्न टिकार यांची उपस्थिती लाभली.
याशिवाय, अकोला ऑटो युनियनचे अध्यक्ष इलियाज लोधी, संतोष शर्मा, खामगाव ऑटो युनियनचे प्रतिनिधी युसुफ खान तसेच मोठ्या संख्येने ऑटो रिक्षाचालक सहभागी झाले.
कार्यशाळेदरम्यान उपस्थितांना मराठीतील दैनंदिन संभाषण, प्रवाशांशी प्रभावी संवाद आणि व्यवहारातील मराठी भाषेचा वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाला रिक्षाचालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती आयोजकांनी दिली.

