MahaIT Portal Down : शासनाच्या महाआयटी पोर्टलवर गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या तांत्रिक बिघाडामुळे महाऑनलाईनच्या सर्व डिजिटल सेवा पूर्णतः विस्कळीत झाल्या असून याचा मोठा फटका विद्यार्थी, शेतकरी व सामान्य नागरिकांना बसत आहे.

तांत्रिक बिघाड; महाऑनलाईन सेवा बंद, कामांना ब्रेक
बबन इंगळे
बार्शीटाकळी : शासनाच्या महाआयटी पोर्टलवर गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या तांत्रिक बिघाडामुळे महाऑनलाईनच्या सर्व डिजिटल सेवा पूर्णतः विस्कळीत झाल्या असून याचा मोठा फटका विद्यार्थी, शेतकरी व सामान्य नागरिकांना बसत आहे.
या बिघाडामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेयर, अधिवास (डोमिसाईल), चारित्र्य पडताळणी आदी महत्त्वाची कागदपत्रे मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांना विविध शासकीय अनुदानित योजनांसाठी आवश्यक असलेल्या सेवा बंद पडल्याने त्यांची कामेही खोळंबली आहेत.
महाऑनलाईन पोर्टलद्वारे दिल्या जाणाऱ्या अनेक नागरिकाभिमुख सेवा ठप्प झाल्याने दैनंदिन कामांवर परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे, या तांत्रिक अडचणीबाबत दररोज पोर्टल लवकरच सुरू होईल, असे संकेत संबंधित यंत्रणेकडून दिले जात असले तरी प्रत्यक्षात सहा दिवस उलटूनही सेवा पूर्ववत झालेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम व नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोर्टल सुरळीत करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर तांत्रिक तज्ञांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, सेवा कधी सुरू होणार याबाबत ठोस माहिती नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन महाआयटी पोर्टल तातडीने सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

