Expanding the Shinde Sena : चार दशकांच्या संघर्षातून उभा राहिलेला प्रहार जनशक्ती पक्ष आज शिंदे सेनेसमोर शरण गेला, हा केवळ राजकीय निर्णय नसून कार्यकर्त्यांच्या त्यागाचा अवमान आहे,अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्ते कृष्णराव गावंडे यांनी बच्चू कडू यांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली.

संजय उमक
मूर्तिजापूर : चार दशकांच्या संघर्षातून उभा राहिलेला प्रहार जनशक्ती पक्ष आज शिंदे सेनेसमोर शरण गेला, हा केवळ राजकीय निर्णय नसून कार्यकर्त्यांच्या त्यागाचा अवमान आहे,अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्ते कृष्णराव गावंडे यांनी बच्चू कडू यांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली.
गावंडे म्हणाले, प्रहार जनशक्ती पक्षाला निवडणूक आयोगाची औपचारिक मान्यता नसली तरी लोकमान्यता मोठ्या प्रमाणात होती. याच बळावर बच्चू कडू यांनी सामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेत चार दशकांचा प्रवास पूर्ण केला. मात्र, सध्याच्या घडामोडींमध्ये शिंदे सेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने कडूंना आमदारकी मिळाली असली तरी प्रहारचे निष्ठावान कार्यकर्ते मात्र पोरके झाल्याची भावना व्यक्त होत आहे. ज्यांनी आयुष्य घालवून पक्ष उभा केला, त्यांच्याच हातात आता काहीच उरले नाही. हा निर्णय म्हणजे प्रहारच्या राजकीय अस्तित्वालाच विराम देणारा ठरू शकतो,” असा आरोपही त्यांनी केला. पुढे प्रहार पक्ष सामाजिक संघटना म्हणूनच काम करेल, ही वस्तुस्थिती असल्याचेही त्यांनी नमूद केले. गावंडे यांनी भूतकाळाचा दाखला देत सांगितले की, पूर्वीही अशाच राजकीय निर्णयांमुळे अनेक पक्ष आणि कार्यकर्त्यांचे अस्तित्व लोप पावले आहे. “गड मिळाला, पण सिंह गेला,” अशा शब्दांत त्यांनी सध्याच्या परिस्थितीचे वर्णन केले.
विदर्भात शिंदे सेनेचा विस्तार करण्यासाठी हा राजकीय डाव असल्याचा आरोप करत, “आमदारकीसाठी चाळीस वर्षांचा पक्ष विलीन करणे हा दूरदृष्टी नसलेला निर्णय आहे,” अशी टीका त्यांनी केली. राजकारण हा पाण्याचा बुडबुडा आहे, बिनबुडाचा लोटा आहे, अशा मार्मिक शब्दांत त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करत कार्यकर्त्यांच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित केला.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

