Women launch : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवेगाव, उंबरवाडी व परिसरातील गावांमध्ये सुरू असलेल्या कथित अवैध गावठी दारूविक्रीविरोधात सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी चान्नी पोलीस ठाण्यावर धडक देत निवेदन सादर केले. अवैध दारूविक्री तात्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

दारूबंदीची ठाम मागणी; नवेगाव–उंबरवाडी परिसरातील महिलांचा प्रशासनाला इशारा
राहुल सोनोने
दिग्रस बु. : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवेगाव, उंबरवाडी व परिसरातील गावांमध्ये सुरू असलेल्या कथित अवैध गावठी दारूविक्रीविरोधात सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी चान्नी पोलीस ठाण्यावर धडक देत निवेदन सादर केले. अवैध दारूविक्री तात्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
महिलांनी दिलेल्या निवेदनानुसार, अवैध दारूविक्रीमुळे तरुणाईसह अल्पवयीन मुलांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. तसेच दारूच्या नशेत वाहन चालविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले असून निष्पाप नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
नागरिकांनी यापूर्वीही संबंधित प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्याचा दावा करण्यात आला. मात्र, अपेक्षित कारवाई होत नसल्याने महिला व ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अवैध दारूविक्री तातडीने बंद करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनात २९ जून २०२६ रोजी सावरगाव–झरंडी मार्गावर झालेल्या भीषण अपघाताचाही उल्लेख करण्यात आला आहे. दारूच्या नशेत वाहन चालविल्यामुळे झालेल्या या अपघातात आकाश शेषराव शिंदे व अजय चोंढकर या दोन युवकांचा मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेला तिसरा युवक नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अवैध दारूविक्रीवर प्रभावी नियंत्रण नसल्याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
यासंदर्भातील निवेदन अकोला जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच चान्नी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दराडे यांच्याकडे पाठविण्यात आल्याचे निलेश कापकर यांनी सांगितले. अवैध दारूविक्री तात्काळ बंद करण्यात यावी, अन्यथा भविष्यात अशा प्रकारांमुळे कोणतीही जीवितहानी किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
तसेच, ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आलेगाव, कार्ला, गोळेगाव, पाडशिंगी, सावरगाव, झरंडी, नवेगाव, उंबरवाडी, अंधारसांगवी, पांढुर्णा, सोनुना, पिंपळडोळी व परिसरातील महिला-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होऊन अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश एल्गार मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला.
यावेळी दुर्गाबाई ठाकरे, लताबाई डुकरे, शीतल धंदरे, रूपाली वाथे, शोभा डाखोरे, शालिनी वाथे, कमलाबाई ताजने, लक्ष्मीबाई तिवाले, पारूबाई गायकवाड, कमलाबाई धंदरे, रुक्माबाई शिंदे, निलेश कापकर, समाधान शिंदे, समाधान गाढवे यांच्यासह परिसरातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

